प्रकाश आंबेडकर यांची भाजपावर जोरदार टीका!
अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.. अकोल्यातील कृषी नगर भागातील महापालिका शाळेत त्यांनी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या सह मतदान केले. दरम्यान या मतदाना
प्रकाश आंबेडकर यांची भाजपावर जोरदार टीका!


अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)।

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.. अकोल्यातील कृषी नगर भागातील महापालिका शाळेत त्यांनी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या सह मतदान केले. दरम्यान या मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजप वर जोरदार टीका केली. आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड भूमिका मांडली.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आजचा मतदार अधिक जागरूक झाला आहे. नागरिकच आता नेत्यांना सुधारत असून, आवश्यकतेनुसार त्यांना धडाही शिकवत आहेत.” लोकशाही व्यवस्थेत मतदारांची भूमिका अधिक प्रभावी होत चालल्याचे त्यांनी नमूद केले. अकोला महापालिकेच्या ८० जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. तर “मी यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका बारकाईने पाहत आहे. ही निवडणूक भाजपची गेल्या दहा वर्षांची दादागिरी मोडणारी ठरणार आहे.” भाजपला ‘वन पार्टी सिस्टीम’ हवी आहे, मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक भाजपविरोधात होत असून जनतेला मल्टी पार्टी सिस्टीम हवी असल्याचं त्यांनी सांगितलं.तसेच, कोणत्याही महापालिकेत एकहाती सत्ता येणार नाही आणि हेच चित्र मुंबई महापालिकेतही पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, निवडणुकीदरम्यान पैसा वाटपाच्या घटना घडत असल्या तरी दुसरीकडे मतदारच अशा लोकांना हाकलून लावत असल्याचं दिसत आहे. ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी नमूद केलं.

दरम्यान, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी निवडणुकीतील मुद्द्यांवर भाष्य करताना सांगितले की, “मुद्दे भटकावण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी, ज्यांनी स्थानिक प्रश्न आणि स्थानिक मुद्दे प्रामाणिकपणे निवडणुकीत मांडले, त्यांनाच मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे.” सध्या महाराष्ट्रात हेच चित्र दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांसारखे प्रश्न केंद्रस्थानी येत असून, मतदार या मुद्द्यांवर अधिक सजगपणे मतदान करत असल्याचे या प्रतिक्रियांतून अधोरेखित होते. एकूणच, लोकशाही प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग वाढत असल्याचे चित्र यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande