
नवी दिल्ली , 15 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि आंदोलनांमुळे परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे.इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार तयारी करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी शुक्रवारपासून विशेष मोहीम सुरू होऊ शकते.
सूत्रांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालय इराणमधील सध्याच्या अस्थिर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि भारतात परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी व्यापक तयारी करत आहे. गेल्या 15 दिवसांपासून इराणमध्ये सुरू असलेले आंदोलन आणि हिंसाचारामुळे तेथील अंतर्गत परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. अहवालांनुसार, सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती आता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. यामुळे तेथे राहणाऱ्या परदेशी नागरिकांसह विशेषतः भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या नागरिकांना प्राधान्याने इराणमधून बाहेर काढण्याची योजना अंतिम टप्प्यात नेली आहे.
अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार शुक्रवारपासून विशेष अभियान सुरू करू शकते. परराष्ट्र मंत्रालय सध्या अशा नागरिकांचा डेटा आणि तपशील गोळा करत आहे, जे सध्याच्या परिस्थितीमुळे भारतात परतण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
इराणमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद असून, दूरध्वनी सेवा देखील अधूनमधूनच कार्यरत आहेत. या संचार अडथळ्यांमुळे तेहरानमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी प्रत्यक्ष विविध भागांत जाऊन भारतीय विद्यार्थी आणि इतर नागरिकांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, बुधवारी तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या सूचनेत दूतावासाने म्हटले आहे की,इराणमध्ये असलेले भारतीय नागरिक (विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटक) यांनी व्यावसायिक विमानसेवांसह उपलब्ध कोणत्याही वाहतुकीच्या साधनांचा वापर करून इराण सोडावे.
तसेच इराणमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. आंदोलन व अशांततेच्या भागांपासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश. भारतीय नागरिकांनी दूतावासाशी सातत्याने संपर्कात राहावे. कोणत्याही नव्या घडामोडींसाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन. पासपोर्ट, ओळखपत्र आणि इतर प्रवास व स्थलांतराशी संबंधित कागदपत्रे नेहमी तयार ठेवण्याचा सल्ला.याचसोबत दूतावासाने आपत्कालीन संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. मोबाईल क्रमांक: +989128109115; +989128109109; +989128109102; +989932179359, ई-मेल: cons.tehran@mea.gov.in
सल्ल्यात असेही नमूद करण्यात आले आहे की, इराणमध्ये असलेले आणि अद्याप भारतीय दूतावासात नोंदणी न केलेले भारतीय नागरिकांनी https://www.meaers.com/request/home या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ही लिंक दूतावासाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
इराणमध्ये इंटरनेट समस्येमुळे नोंदणी करता येत नसल्यास, भारतातील त्यांच्या कुटुंबीयांनी नोंदणी करण्याची विनंती करण्यात आली आहे.इराणमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या सूचना जारी केल्या आहेत. बुधवारी आंदोलनाचा 20 वा दिवस होता. विक्रमी महागाई आणि इरानी चलनाच्या मोठ्या घसरणीविरोधात सुरू झालेले आंदोलन आता देशव्यापी अशांततेत रूपांतरित झाले असून, 280 हून अधिक ठिकाणी निदर्शनांची नोंद झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode