
सोलापूर, 17 जानेवारी (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ ची मतमोजणी प्रक्रिया आज अत्यंत शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पडली. शहरातील निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली.
या निवडणुकीत एकूण २६ प्रभागांसाठी मतदान घेण्यात आले होते. शहरातील १,०९१ मतदान केंद्रांवर ९,२४,७०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारीनिहाय ७ ठिकाणी स्ट्रॉंगरूम व मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व केंद्रांवर अग्निशमन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच आवश्यक प्रशासकीय व सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आली होती.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ७ यांच्या कार्यक्षेत्रातील निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वितरण नियमानुसार व शांततेत करण्यात आले.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मतदार, उमेदवार, निवडणूक कर्मचारी, पोलीस प्रशासन, माध्यम प्रतिनिधी तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेल्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.
लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत नागरिकांनी दाखवलेला सकारात्मक सहभाग व शिस्तबद्ध सहकार्य यामुळे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली, असेही डॉ. ओम्बासे यांनी नमूद केले.
विजयी उमेदवारांची सविस्तर व अधिकृत माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या
https://electionresult.solapurcorporation.org/online.aspx
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड