
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) - एकीकडे २५ वर्षांची सत्ता असलेली मुंबई महापालिका शिवसेना ठाकरे गटाच्या हातून निसटली, तर दुसरीकडे शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यामुळे शिवसेनेसाठी एकाच दिवशी दोन धक्कादायक घटना घडल्या. पक्षाशी एकनिष्ठ राहणारी एक झुंजार महिला नेतृत्व हरपले, अशा भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिक, शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांची शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नीला देसाई यांची प्राणज्योत मालवली. एकीकडे निकाल समोर येत असतानाच नीला देसाई यांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचाराआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज, शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांच्यावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीला देसाई यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून येत शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळवला होता. एकीकडे निवडणुकीतील निसटत्या पराभवाने ठाकरेंना धक्का बसला असतानाच नीला देसाई यांच्या निधनाची बातमी आल्याने शिवसेना ठाकरे गटाला दुहेरी धक्का बसला आहे.
नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या फळीतील आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा वावर अत्यंत मर्यादित होता, अशा कठीण काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नीला देसाई यांच्यावर विश्वास टाकला होता. बाळासाहेबांच्या शब्दाखातर मैदानात उतरणाऱ्या देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार (विधान परिषद सदस्य) ठरल्या होत्या. त्यांनी अनेक वर्षे पक्षात निष्ठेने काम केले आणि महिला आघाडी मजबूत करण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी