
एमआयएम ठरला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष
नांदेड, 17 जानेवारी (हिं.स.)।
नांदेड महानगरपालिकेची निवडणुक आणि एमआयएम हे नाते नवे राहिले नाही तर, जुने झाले असे म्हणावे लागेल. यापूर्वीही एकवेळा येथे एमआयएमने नगरसेवकपद संख्या दोन आकडी गाठली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांदा या पक्षाचे तब्बल १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे हा राजकीय पक्ष महापालिकेत भाजपानंतर थेट दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एमआयएमची ही 'पतंग' बाजी राजकीय वर्तुळाला आचंबित करणारी ठरली आहे. महापालिकेच्या
निवडणुकीत इतर प्रमुख राजकीय पक्षांनी जशी पूर्वतयारी केली होती, तशी एमआयएमने केलेली नव्हती हे कटू सत्य आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तारखेच्या
काही दिवस आधी या पक्षाने ही निवडणुक लढण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यांनी प्रभाग क्र. २ तरोडा (बु), प्रभाग क्र.५ कैलानगर, भाग्यनगर, प्रभाग क्र.७जयभीम नगर, प्रभाग क्र. ८ शिवाजीनगर, प्रभाग क्र. १० दत्तनगर, प्रभाग क्र. ११ हैदरबाग, प्रभाग क्र. १२ उमर कॉलनी, प्रभाग क्र. १३ मंडई, चौफाळा, प्रभाग क्र. १४ इतवारा मदिनानगर, प्रभाग क्र. १५ होळी, प्रभाग क्र. १८ खडकपूरा आदी भागात आपले उमेदवार निवडणुक रिंगणात उतरविले होते. या पक्षाने उमेदवार देताना बहुतांशी प्रभाग हे मुस्लिम व दलित बहुल मतदार संख्या असलेले निवडलेले होते. त्यांची ही उमेदवार निवडीची 'मात्रा' चपखल लागू पडली. याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. ओवेसी यांच्या शहरात दोन
प्रचारसभा झाल्या. या सभेची अन् खा. ओवेसी यांच्या भाषणाची' जादू' ही निवडणुकीत चालली असे म्हणावे लागेल. यात उल्लेखनिय असे की, मुस्लिम मतदार हा काँग्रेसची 'वोटबँक' आहे, असे सातत्याने म्हटले जाते. हे खरे आहे असे मानले तरी, या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मानली जाण्यारी ही 'वोटबँक' पूर्णतः एमआयएमच्या पारड्यात पडली हे निकालाअंती स्पष्ट झाले आहे. परिणामी या पक्षाचे महानगरपालिकेत तब्बल १४ नगरसेवक निवडून आले असून हा पक्ष भाजपानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. महानगरपालिकेच्या सभागृहातील एमआयएमचे संख्याबळ लक्षात घेता, या पक्षाचा विरोधी पक्षनेता पदावरुन प्रथम दावा असू शकतो, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis