रत्नागिरीत ६ जानेवारीपासून कीर्तनसंध्या महोत्सवात महाभारताचा उत्तरार्ध
रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरीच्या सांस्कृतिक परंपरेला नवे वैभव प्राप्त करून देणारा कीर्तनसंध्या महोत्सव यावर्षी येत्या ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महाभारताचा उत्तरार्ध असा यावर्षीच्या महोत्सवाचा विषय आहे
हभप चारुदत्तबुवा आफळे


रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरीच्या सांस्कृतिक परंपरेला नवे वैभव प्राप्त करून देणारा कीर्तनसंध्या महोत्सव यावर्षी येत्या ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. महाभारताचा उत्तरार्ध असा यावर्षीच्या महोत्सवाचा विषय आहे.

महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती हभप चारुदत्त आफळेबुवा आपल्या ओघवत्या, भावस्पर्शी आणि प्रभावी शैलीत भारतीय इतिहास, भक्तिरस व विचारांचा त्रिवेणी संगम साधणार आहेत. सलग सहा दिवस दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चार तास चालणाऱ्या कीर्तनातून रसिक श्रोत्यांना इतिहासाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. गेल्या वर्षी महाभारताच्या पूर्वार्धावर निरूपण करण्यात आले. पांडव–कौरवांचे संघर्ष, त्यांचे निर्णय, त्यांची मूल्ये आणि धर्म–अधर्माच्या सीमारेषा यांचा त्यात समावेश होता. यावर्षी महाभारताच्या उत्तरार्धात महान संग्रामाच्या निर्णायक वळणाचे निरूपण करण्यात येणार आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीत उतरणाऱ्या प्रत्येक योद्ध्याच्या मनातील भावविश्व, धैर्य, अढळ निश्चय आणि कर्तव्यनिष्ठा यांचे विवरण हभप चारुदत्तबुवा आफळे नेहमीच्याच शैलीत रंगविणार आहेत. एकूण चोवीस तासांचे इतिहास सादरीकरण हे या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असेल. महोत्सवाचे मुख्य प्रायोजकत्व पितांबरीने स्वीकारले आहे.

दरवर्षीप्रमाणेच रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात हा महोत्सव होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात वेदमूर्तींच्या मंत्रघोषाने तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात येणार असून वेळेचे काटेकोर पालन ही कीर्तनसंध्येची खास ओळख आहे.

आबालवृद्धांसाठी उपयुक्त असा हा कार्यक्रम असून कीर्तनाच्या माध्यमातून संस्कार, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्ये रुजवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध व नीटनेटके करण्यात आले आहे. प्रेक्षकांच्या सोयीसाठी भारतीय बैठक तसेच खुर्ची व्यवस्था, तसेच ग्राउंडमध्येच प्रशस्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कीर्तनसंध्या २०२६ या महोत्सवात नामवंत कलाकारांची प्रभावी साथसंगत लाभणार असून त्यामध्ये तबला – केदार लिंगायत, पखवाज – मंगेश चव्हाण, ऑर्गन – चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन – उदय गोखले, तालवाद्य – हरेश केळकर, बासरी – मंदार जोशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत.

कीर्तन महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून देणगी सन्मानिका कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतील. इतिहास, भक्ती, विचार आणि संस्कार यांचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत जोशी (९०११६६२२२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande