स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे देण्याचे आवाहन
नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)। आजच्या युगात डिजिटल साक्षर होणे अत्यंत आवश्यक असून, डिजिटल व्यवहार करताना संपूर्ण माहिती घेऊनच काळजीपूर्वक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल व्यवहार करताना येणारे संदेश तपासणे, फेकलिंक व संशयास्पद ॲप्स ओळखण्यासाठी इ
नांदेड


नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)।

आजच्या युगात डिजिटल साक्षर होणे अत्यंत आवश्यक असून, डिजिटल व्यवहार करताना संपूर्ण माहिती घेऊनच काळजीपूर्वक व्यवहार करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल व्यवहार करताना येणारे संदेश तपासणे, फेकलिंक व संशयास्पद ॲप्स ओळखण्यासाठी इंटरनेटवर माहिती पडताळून घेणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळता येईल. युवावर्गाने स्वतः डिजिटल साक्षर व्हावे आणि हीच माहिती घरच्यांपर्यंत पोहोचवून त्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्यावेत, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या शलाका ढमढेरे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे, आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जगदीश बारदेवाड, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा संघटक ॲड. आनंद कृष्णापूरकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सायन्रा मठमवार, सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्ष राहुल पाटील पुढे म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा 2019 ची व्याप्ती व्यापक असून आपण दररोज कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ग्राहक असतो. सेवा बदलून देणे, नुकसान भरपाई देणे तसेच कायद्याची अंमलबजावणी न केल्यास शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे. ग्राहक जागरूकता हा या कायद्यातील महत्त्वाचा हक्क असून, ही जबाबदारी शासनासह प्रत्येकाची आहे.

डिजिटल साक्षरतेमुळे ग्राहकांना ई-जागृती पोर्टलवर घरबसल्या तक्रार नोंदविता येते तसेच आभासी पद्धतीने सुनावणीत सहभागी होता येते, अशी माहितीही त्यांनी दिली. ई-कॉमर्स व ऑनलाईन खरेदी व्यवहार करताना आधी पडताळणी करूनच व्यवहार करावेत. बँकिंग व्यवहारात ओटीपी, लिंक, बँक डिटेल्स कोणालाही देऊ नयेत व संशयास्पद लिंक उघडू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, दैनंदिन जीवनात फसव्या जाहिराती, प्रलोभने, प्रवासातील गैरसोयी यासारख्या अनेक ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते. मात्र फसवणूक झाल्यानंतर कुठे व कशी तक्रार करायची याची माहिती नसल्यामुळे अनेक ग्राहक पुढे येत नाहीत. यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असून, प्रत्येकाने स्वतः जागरूक होऊन इतरांनाही प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने देशपातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी आयोगाचे कौतुक केले व भविष्यात ग्राहक जागृतीसाठी आणखी प्रभावी उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी ग्राहक हा राजा असून त्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे राष्ट्रीय ग्राहक दिन असल्याचे सांगितले. सेवा देताना कर्तव्य भावना ठेवली तर ग्राहकांची फसवणूक होणार नाही. प्रत्येक ग्राहक हा न्यायाधीश असल्याने जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे संघटक ॲड. आनंद कृष्णापूरकर, उपाध्यक्ष डॉ. सायन्रा मठमवार, सहसचिव ॲड. दिपाली डोणगावकर यांनी ग्राहक जागृतीसाठी मनोगत व्यक्त केले. स्वरा गौतम भुसावळ, लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळा, कल्याणनगर (नांदेड) येथील विद्यार्थिनीनेही आपले विचार मांडले.

कार्यक्रमात बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भोकर यांनी पथनाट्य सादर केले, तर “मी एक ग्राहक” हे पथनाट्य जिल्हा परिषद शाळा, पार्डी मक्ता (ता. अर्धापूर) येथील विद्यार्थ्यांनी सादर केले. “मी एक जागरूक ग्राहक” या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande