
रायगड, 02 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील ताम्हणी घाटात आज सकाळी खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. ताम्हणी घाटातील गारवा हॉटेल परिसरात हा अपघात घडला असून बसमधील एकूण २० प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये ५ ते ६ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर खाजगी बस घाटमार्गाने प्रवास करत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना तात्काळ बसमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने माणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर तत्काळ उपचार सुरू असून काही जणांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या अपघातामुळे काही काळ ताम्हणी घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक तपासात चालकाचा निष्काळजीपणा व वेगावर नियंत्रण नसणे हे अपघाताचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. ताम्हणी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घेऊन वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके