
छत्रपती संभाजीनगर, 21 जानेवारी (हिं.स.)। शिक्षकांमधून मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदांवर पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आवश्यकच असणार आहे. 'टीईटी' सह पदोन्नतीसाठी आवश्यक अर्हता असेल तेच शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र ठरतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे राज्यभरातील अशा शिक्षकांसाठीचा पदोन्नतीचा तूर्तास मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे.
राज्यभरातील शिक्षक पदोन्नती प्रक्रियेद्वारे पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) व विस्तार अधिकारी (शिक्षण) पदावर जातात. शिक्षण विभागाकडून या निकषानुसार प्रक्रिया राबविली जाते. न्यायालयाने या प्रकरणी निर्णयात आता अशा पदांवर पदोन्नतीसाठी 'टीईटी' बंधनकारक असल्याचे म्हटले होते. निर्णय राज्यभरातील शिक्षकांना लागू असणार का, याबाबत तर्कविर्तक, शिक्षकांमधून त्याबाबत चर्चा सुरू होती. त्यासह याबाबत राज्यभरातील शिक्षकांमधून विरोधही होत होता. दरम्यान यानंतर अनेक जिल्ह्यांमधील पदोन्नतीची प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर आता शिक्षण विभागाने पदोन्नतीसाठी 'टीईटी' आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पदोन्नतीसाठी शिक्षकांना 'टीईटी' उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. तर निर्णयाने विविध जिल्ह्यातील पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात येते. एकीकडे शिक्षकांचा निर्णयाला विरोध होता. त्याचवेळी नुकत्याच झालेल्या 'टीईटी' परीक्षेत
अनेक शिक्षकांनी अर्ज भरल्याने परीक्षार्थीची संख्या वाढल्याची चर्चा होती. पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक शिक्षकांनी शिक्षकांनी ही परीक्षा दिली होती. 'टीईटी' बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळेच परीक्षार्थीची संख्या वाढल्याची चर्चा शिक्षकांमध्ये होती.
शिक्षकांसाठी पदोन्नती आणि सरळ सेवेचे नियम बदलले आहेत. 'टीईटी' उत्तीर्ण असणे अनिवार्य आहेच. तसेच पदोन्नतीसाठी वयाची अट आणि निकषांचे पालन आवश्यक आहे. केंद्रप्रमुखांची पदे ५० टक्के पदोन्नतीने आणि ५० टक्के स्पर्धा परीक्षेतून भरली जातात. विस्तार अधिकाऱ्यांची पदे ५० टक्के सरळ सेवा, २५ टक्के स्पर्धा परीक्षा तर २५ टक्के पदोन्नती. मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची शंभर टक्के पदे पदोन्नतीतून भरली जातात.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis