
नाशिक, 21 जानेवारी (हिं.स.)। मराठी भाषेचा प्रचार व प्रसार, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर तसेच मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, नाशिकरोड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड हद्दीतील इयत्ता 5 ते 9 वी पर्यंतच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा ज्ञान स्पर्धा, शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त अरविंद लोखंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
असे आहे स्पर्धांचे वेळापत्रमराठी भाषा ज्ञान स्पर्धा ही 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 ते 4 यावेळेत कोठारी कन्या शाळा नाशिकरोड येथे होणार आहे.शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ही 24 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत पुरूषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय, नाशिकरोड येथे होणार आहेत.
नाशिकरोड हद्दीतील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळांनी 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपावेतो कमीत कमी 10 विद्यार्थ्यांची नावे कोठारी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता कासार (व्हॉटसॲप क्रमांक 9604032214) यांच्याकडे नोंदवावीत. स्पर्धांच्या अनुषंगाने 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त यांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात येणार असल्याचेही अपर आयुक्त श्री लोखंडे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV