
छत्रपती संभाजीनगर, 21 जानेवारी (हिं.स.)।
प्रेमसंबंधांनंतर दुरावा निर्माण होऊन प्रेयसीकडून लग्नास नकार मिळाल्यामुळे तरुणाने जीवन संपवले असेल तर त्याला 'आत्महत्येस प्रवृत्त केले' असे म्हणता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ( छत्रपती संभाजी नगर) खंडपीठाचे न्या. संतोष चपळगावकर यांनी तरुणीविरुद्ध दाखल प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) आणि दोषारोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रारदाराचा मुलगा (नाव बदललेले) आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुलाने डिसेंबर २०२३ मध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. अर्जदार तरुणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि तिने लग्नास नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप आकाशच्या पालकांनी केला होता. या प्रकरणात तरुणीच्या वतीने अॅड. सय्यद तौसीफ यासीन यांनी युक्तिवादात केवळ प्रेमसंबंध तुटणे किंवा मोबाईल फोनवर संवाद होणे ही कृती आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या व्याख्येत बसत नाही, असे न्यायालयात सांगितले.
न्या. चपळगावकर यांनी हा युक्तिवाद मान्य करत स्पष्ट केले की, आत्महत्येचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी आरोपीचा विशिष्ट हेतू असणे आवश्यक आहे, जो या प्रकरणात दिसून येत नाही. केवळ लग्नास नकार देणे हा कोणताही सकारात्मक गुन्हा किंवा चिथावणी ठरू शकत नाही. पुराव्यांवरून आकाशला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे दिसून येत नाही. न्यायालयाने बीड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेले आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis