
बाजारातील मजबुतीमुळे गुंतवणूकदारांनी कमावले 6.06 लाख कोटी रुपये
नवी दिल्ली, 28 जानेवारी (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजार आज सलग दुसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहाराची सुरुवातही सकारात्मक वातावरणात झाली होती. बाजार उघडल्यानंतर पहिल्या सत्रात सातत्याने खरेदीचा जोर दिसून आला. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात मोठ्या प्रमाणावर नफावसुली झाली. मात्र, व्यवहाराच्या शेवटच्या तासात खरेदीदारांनी पुन्हा एकदा आक्रमक खरेदी केली, त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत वेगाने वाढ झाली. संपूर्ण दिवसाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 0.60 टक्के, तर निफ्टी 0.66 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
आज दिवसभराच्या व्यवहारात संरक्षण (डिफेन्स) आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी पाहायला मिळाली. निफ्टीचा डिफेन्स निर्देशांक तब्बल 5 टक्क्यांपर्यंत उसळला. बीएसईचा कॅपिटल गुड्स निर्देशांकही 5 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय इंडस्ट्रियल, एनर्जी, कॅपिटल गुड्स, ऑइल अँड गॅस, बँकिंग, ऑटोमोबाईल, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, हेल्थ केअर, मेटल आणि टेक निर्देशांकही मजबुतीसह बंद झाले. दुसरीकडे, एफएमसीजी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. ब्रॉडर मार्केटमध्येही सातत्याने खरेदी सुरू राहिल्यामुळे बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.69 टक्क्यांच्या वाढीसह, तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.81 टक्क्यांच्या तेजीने बंद झाला.
शेअर बाजारातील या मजबुतीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सहा लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन आजच्या व्यवहारानंतर वाढून 459.73 लाख कोटी रुपये (तात्पुरते) झाले. मागील व्यवहार दिवशी म्हणजे मंगळवारी हे मार्केट कॅपिटलायझेशन 453.67 लाख कोटी रुपये होते. त्यामुळे आजच्या व्यवहारातून गुंतवणूकदारांना सुमारे 6.06 लाख कोटी रुपयांचा नफा झाला.
आज दिवसभराच्या व्यवहारात बीएसईमध्ये 4,373 शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार झाला. यापैकी 2,945 शेअर्स वाढीसह बंद झाले, 1,291 शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर 137 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. एनएसईमध्ये 2,917 शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी 2,254 शेअर्स नफ्यासह हिरव्या निशाणात, तर 663 शेअर्स तोट्यासह लाल निशाणात बंद झाले. सेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्स वाढीसह, तर 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीतील 50 पैकी 32 शेअर्स हिरव्या, तर 18 शेअर्स लाल निशाणात बंद झाले.
बीएसईचा सेन्सेक्स आज 34.88 अंकांच्या किरकोळ वाढीसह 81,892.36 अंकांवर उघडला. व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळातच खरेदीचा जोर वाढल्यामुळे सेन्सेक्स 646.49 अंकांची उसळी घेत 82,503.97 अंकांपर्यंत पोहोचला. दुपारी 12 वाजेपर्यंत सेन्सेक्स किरकोळ चढ-उतारांसह मजबूत राहिला. मात्र, नफावसुलीमुळे दुपारी दोन वाजण्याच्या थोड्याच आधी सेन्सेक्स वरच्या स्तरावरून सुमारे 690 अंक घसरत 42.73 अंकांच्या तोट्यासह 81,814.75 अंकांपर्यंत खाली आला. शेवटच्या तासात पुन्हा खरेदी वाढल्यामुळे सेन्सेक्स खालच्या स्तरावरून सुमारे 530 अंकांनी उंचावत 487.20 अंकांच्या वाढीसह 82,344.68 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सप्रमाणेच एनएसईचा निफ्टीही आज 83.45 अंकांनी वाढत 25,258.85 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांतच निफ्टी 196.70 अंकांच्या वाढीसह 25,372.10 अंकांपर्यंत पोहोचला. या पातळीवर पोहोचल्यानंतर नफावसुली सुरू झाल्याने निफ्टीमध्ये चढ-उतार दिसून आले. दुपारी दोन वाजण्याच्या थोड्याच आधी विक्रीच्या दबावामुळे निफ्टी घसरून 25,187.65 अंकांपर्यंत आला. मात्र, तीव्र विक्री असूनही निफ्टी दिवसभर हिरव्या निशाणातच राहिला. दुपारी 2:30 नंतर पुन्हा खरेदी वाढल्यामुळे निफ्टी खालच्या स्तरावरून सुमारे 155 अंकांनी उसळत 167.35 अंकांच्या वाढीसह 25,342.75 अंकांवर बंद झाला.
आजच्या व्यवहारानंतर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स 8.91 टक्के, ओएनजीसी 8.32 टक्के, कोल इंडिया 5 टक्के, एटरनल 4.90 टक्के आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज 3.78 टक्क्यांच्या वाढीसह टॉप 5 गेनर्समध्ये समाविष्ट झाले. तर दुसरीकडे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स 4.68 टक्के, एशियन पेंट्स 4.23 टक्के, मारुती सुझुकी 2.41 टक्के, मॅक्स हेल्थकेअर 1.73 टक्के आणि सन फार्मास्युटिकल्स 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप 5 लूजर्सच्या यादीत समाविष्ट झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule