
राजकोट, 03 जानेवारी (हिं.स.)अनुभवी भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने विदर्भाविरुद्ध आपली ताकद दाखवली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्यासाठी खेळताना हार्दिकने एका षटकात सलग पाच षटकार मारत एक दमदार शतक झळकावले. हार्दिकने त्याच्या आक्रमक फलंदाजीचे कौशल्य दाखवत ९३ चेंडूत १३३ धावा केल्या.
एकेकाळी बडोद्याची अवस्था 6 बाद १३६ होती. पण त्यानंतर हार्दिकने त्याची जादू दाखवली. त्याने त्याच्या डावात एकूण ११ षटकार आणि आठ चौकार मारले. हार्दिकने फक्त ६८ चेंडूत शतक पूर्ण केले आणि टी२० विश्वचषकापूर्वी जोरदार फलंदाजी केली. या स्पर्धेत आपला पहिला सामना खेळताना हार्दिकने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि धमाकेदार खेळी केली. त्याने त्याच्या ११९ व्या सामन्यात पहिले लिस्ट ए शतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे बडोद्याने नऊ बाद २९३ धावा केल्या.
हार्दिकने ३९ व्या षटकात विदर्भाचा फिरकी गोलंदाज पार्थ रेखाडेला लक्ष्य केले. त्याने या षटकात एकूण ३४ धावा केल्या, ज्यात पाच षटकार आणि एक चौकार यांचा समावेश होता. त्याने पहिल्या पाच चेंडूंवर षटकार मारले पण शेवटच्या चेंडूवर त्याला फक्त एक चौकार मारता आला. हार्दिककडे सहा षटकार मारण्याची सुवर्णसंधी होती, पण शेवटच्या चेंडूवर चौकार गेला आणि त्याला ही कामगिरी करता आली नाही. हार्दिकच्या वर्चस्वाचा अंदाज बडोद्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावसंख्या विष्णू सोलंकीने २६ धावा केल्या यावरूनही लावता येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे