
सिडनी, ५ जानेवारी (हिं.स.)ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने त्यांच्या पहिल्या डावात ३८४ धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर त्यांच्या पहिल्या डावात २ विकेट्स गमावून १६६ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजांनी क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. रूटने २४२ चेंडूंचा सामना केला आणि १५ चौकारांसह १६० धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ४१ वे शतक ठरले आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या 41 कसोटी शतकांशी बरोबरी केली आहे. पॉन्टिंगने आपल्या कसोटी कारकिर्दीत १६८ सामन्यांमध्ये ४१ शतके झळकावली होती. जो रूट आता सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
या यादीत, फक्त भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर (५१ शतके) आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस (४५ शतके) रूटच्या पुढे आहेत. हे देखील उल्लेखनीय आहे की २०२१ नंतर रूटचे २४ वे कसोटी शतक आहे. जे या काळात कोणत्याही फलंदाजाने केलेले सर्वाधिक आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावात रूट व्यतिरिक्त, हॅरी ब्रूकने ८४ धावा आणि जेमी स्मिथने ४६ धावा केल्या. विल जॅक्स आणि बेन डकेटने प्रत्येकी २७ धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाकडून मायकेल नेसर सर्वात यशस्वी गोलंदाज होता, त्याने चार विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर कॅमेरॉन ग्रीन आणि मार्नस लाबुशेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस विकेट्स गमावून १६६ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्याने ८७ चेंडूत नाबाद ९१ धावा केल्या, तर नाईट वॉचमन मायकेल नेसर १५ चेंडूत १ धावा काढून नाबाद राहिला. सलामीवीर जेक वेदरल्डने २१ आणि मार्नस लाबुशेनने ४८ धावा केल्या.
----------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे