
ढाका, 06 जानेवारी (हिं.स.)२०२६ चा टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे. पण स्पर्धेपूर्वी भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेट संघर्ष सातत्याने वाढत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) चे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी स्पष्ट केले आहे की, बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी स्थळ बदलण्याची विनंती केली आहे आणि आता पुढील कारवाईसाठी आयसीसीच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे.
४ जानेवारी रोजी पाठवलेल्या या पत्रात बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ने स्पष्टपणे म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत संघाच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता आहेत. म्हणूनच बांगलादेशने भारतात प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. केकेआरने आयपीएल २०२६ च्या आधी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला सोडले तेव्हा हा निर्णय घेण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना अमिनुल इस्लाम यांनी सांगितले की, हा निर्णय घाईघाईने घेण्यात आला नव्हता.
बीसीबी अध्यक्ष म्हणाले, आम्ही या विषयावर सर्व बोर्ड संचालकांसोबत दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या. सध्याच्या परिस्थितीत, आम्हाला आमचा संघ भारतात पाठवण्यास सुरक्षित वाटत नाही. सुरक्षा ही आमची सर्वात मोठी चिंता आहे.
बीसीबी अध्यक्षांनी असेही स्पष्ट केले की, बोर्डाने सुरुवातीला आयसीसीकडे तीन महत्त्वाचे मुद्दे मांडण्याची योजना आखली होती, परंतु शेवटी फक्त एका औपचारिक मागणीवर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. इस्लाम म्हणाले, आम्ही आयसीसीला ईमेल पाठवला आहे आणि आशा आहे की, ते लवकरच आमच्याशी भेटतील, जिथे आम्ही आमच्या चिंतांबद्दल सविस्तर चर्चा करू. अमिनुल इस्लाम यांनी असेही स्पष्ट केले की, या विषयावर बीसीसीआयशी कोणतीही चर्चा झालेली नाही. ही एक आयसीसी स्पर्धा आहे, म्हणून आमची सर्व चर्चा आयसीसीशी होत आहे. पुढील पावले आयसीसीच्या प्रतिसादावर अवलंबून असतील.
या संपूर्ण प्रकरणादरम्यान, बांगलादेशने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, देशात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२६) चे प्रसारण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ बांगलादेशी चाहते आयपीएल २०२६ चे सामने पाहू शकणार नाहीत. आता सर्वांचे लक्ष आयसीसीच्या निर्णयाकडे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे