
अकोला, 08 जानेवारी (हिं.स.)।राज्यात अनेक ठिकाणी युती आणि आघाडी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असून आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. युतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे.
भाजप नेते महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम पकड असल्याचा दावा करत मिटकरी म्हणाले की, जोपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती, तोपर्यंत ती आशिया खंडातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि सर्वाधिक उत्पन्न देणारी महानगरपालिका म्हणून ओळखली जात होती. मात्र, राजकारण बदलल्यानंतर तिथे भस्मासुरासारखी माणसं आली, ज्यांनी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि भ्रष्टाचार वाढवला, असा आरोप त्यांनी केला.महेश लांडगे यांना प्रतिउत्तर देताना मिटकरी म्हणाले की, कदाचित त्यांना ‘काका’ म्हणायचे असेल, पण त्यांनी चुकून ‘आका’ शब्द वापरला असावा. कोण भ्रष्टाचारी आहे आणि कोण भस्मासुर आहे, हे पिंपरी-चिंचवडच्या जनतेला चांगलेच माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“राष्ट्रवादी काँग्रेस हा वाघाचा पक्ष आहे. त्यामुळे लांडग्या-विंडग्यांकडे आम्ही लक्ष देत नाही,” अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली.
दरम्यान, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वक्तव्यावरही मिटकरी यांनी पलटवार केला. पुणे महानगरपालिका लुटायची ज्यांची इच्छा आहे, तेच लोक अजित पवारांवर आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.आरोप करण्यापूर्वी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा, त्यांना त्यांचे गुण-दोष त्यातच दिसतील, असा टोला लगावत स्वाभिमानी लोकांच्या मागे अशा लोकांनी लागू नये, असा सल्लाही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे