
इगतपुरी, 09 जानेवारी (हिं.स.)।
- जिल्हा भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या उपस्थितीत घोटी-त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या चौपदरीकरणप्रश्नी या मार्गावरील प्रत्येक गावनिहाय सुनावणी होत आहे. साखळी उपोषण सुरू असलेल्या आहुर्ली येथे सुनावणी झाली. यादरम्यान मोठ्या प्रमाणात घरे, बंगले, पॉलिहाऊस, विहिरी बाधित होणार असल्याने त्याची पाहणीही करण्यात आली.
आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील घोटी ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याचे रुपांतर महामार्गात होऊन त्याचे चौपदरीकरण होणार आहे. मोठ्या प्रमाणात या मार्गावरील जमिनी संपादीत होणार असल्याने त्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय व शेतकऱ्यांनी
केलेल्या मागण्यांबाबत निर्णय झाल्याखेरीज भूसंपादन न होऊ देण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्याने पेच कायम आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या हरकतींवर निर्णय घेण्यासाठी स्थानिक पातळीवर सुनावण्या घेतल्या जात आहेत. आज साखळी उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी आहुर्ली येथे जिल्हा भूसंपादन अधिकारी भारदे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. यावेळी भूसंपादन, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या पथकाने बाधीत होणाऱ्या घटकांची पाहणी करून होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आहुर्ली येथील जवळपास पन्नास घरे, बंगले, झाडे, गाळे, बोअर, जनावरांचे गोठे, पॉलिहाऊस आदी बाधित होणार असल्याचे निदर्शनास आले आहे.
यावेळी कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, महादू गायकर, गोविंद खकाळे, रामचंद्र गायकर, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV