
परभणी, 08 जानेवारी (हिं.स.)। जनगणना 2027 पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेत जनगणना कामासाठी अचूक माहिती संकलनासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचार्यांना दिले. अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार आहे. अचूक विश्वासार्ह लोकसंख्या आकडेवारी मिळविण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकियेच्या देखरेखेसाठी केंद्रीय पोर्टल कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे जनगणना संबंधीत सर्व चार्ज अधिकारी कर्मचारी यांनी गट नियोजन, पर्यवेक्षक, प्रगणक यांच्या नियुक्तीबाबत आवश्यक नियोजन तसेच जनगणना प्रक्रियेतील प्रत्येक तरतूद काळजीपूर्वक समजून घेऊन अमंलबजावणी करण्याचे निर्देश अधिका-यांना देण्यात आले. महाराष्ट्र जनगणना संचालनालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पुर्वतयारी कार्यशाळा पार पडली. जनगणना संचानालयाचे सहायक संचालक प्रविण भगत व अरुण साळगांवकर यांनी संगणकीय सादरीकरण व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुलभ पध्दतीने प्रशिक्षण दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह महानगरपालिका उपआयुक्त, सर्व तहसिलदार, न.प. मुख्याधिकारी, नायब तहसिलदार, सहाय्यक महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, नगररचनाकार व जनगणना लिपीक अशा विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये घरयादी व घरगणना ही मे/जून 2026 मध्ये होणार असुन त्याबाबत अधिकारी-कर्मचार्यांच्या प्रशिक्षणालाही प्रारंभ झाला आहे. राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणार आहे. जनगणनेचे काम अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे जनगणना कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशिक्षण, आढावा बैठकीस हजर राहणे व प्रत्यक्ष सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे व प्रशिक्षण दिलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करून कामकाज पार पाडावे असे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी यावेळी सुचित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis