
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे नेते अभिजीत दीपके आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (आयसा)च्या प्रमुख नेहा बोरा यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गुरुवारी गोंधळ उडाला. या वेळी काही लोकांनी घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. सीजेपीच्या ‘लहरा दो तिरंगा’ विरोध मोर्चाच्या एक दिवस आधी ही घटना घडल्याने दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान काही व्यक्तींनी ‘बंद करो’ आणि ‘दफा हो जाओ’ अशा घोषणा दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर नेहा बोरा यांनी आयोजकांना गोंधळ घालणाऱ्यांना सभागृहाबाहेर काढण्याची विनंती केली. यावेळी अभिजीत दीपके यांनी दावा केला की, गेल्या 10 ते 15 दिवसांपासून दिल्लीमध्ये विद्यार्थी आणि तरुणांकडून विरोध प्रदर्शन केले जात आहे. मात्र, प्रशासनाकडून आंदोलकांना बळाचा वापर करून हटवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.या आंदोलनांदरम्यान विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचा दावा दीपके यांनी केला. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि पिनराई विजयन यांच्यासारख्या माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा उल्लेख करत दीपके यांनी या कारवाईच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, ही सर्व कारवाई एका व्यक्तीसाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद केल्याचा दावा
गेल्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या आवाहनानंतर रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला. तसेच दिल्लीतील मेट्रो सेवा आणि अनेक मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमधून दिल्लीमध्ये सुरक्षा दल तैनात करण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.पत्रकारांनाही या कारवाईचा फटका बसल्याचा आरोप दीपके यांनी केला. प्रेस कार्ड असूनही अनेक पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि त्यांना अनेक तास ताब्यात ठेवण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
पत्रकारांचे कॅमेरे हिसकावल्याचा आरोप
नेहा बोरा यांनीही प्रशासनावर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेण्यात आले आणि त्यांना आंदोलनाचे वृत्तांकन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.यावेळी त्यांनी एका महिला पत्रकाराचा उल्लेख केला. संबंधित महिला पत्रकाराला विवेक भगत यांच्याकडून कथित लैंगिक छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यासाठी महिला पत्रकार पोलिसांकडे गेली असता, तिच्याविरोधातच प्रतिदाखल एफआयआर नोंदवण्यात आल्याचा दावाही बोरा यांनी केला.
प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखण्याऐवजी न्यायाची मागणी करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘लहरा दो तिरंगा’ विरोध मोर्चा शुक्रवारी
सीजेपीकडून शुक्रवारी संध्याकाळी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘लहरा दो तिरंगा’ विरोध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. अभिजीत दीपके यांनी नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय ध्वज फडकवणे हा लोकशाही अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले.दिल्लीसह इतर शहरांमध्येही एकाच वेळी तिरंगा मोर्चा काढण्याचे आवाहन सीजेपीने केले आहे.
कनॉट प्लेस आणि जंतर-मंतर परिसरात सुरक्षा वाढवणार
दरम्यान, पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कनॉट प्लेस आणि जंतर-मंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाणार आहे. काही ठिकाणी निमलष्करी दल तैनात केले जाण्याची शक्यता आहे.जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावले जाऊ शकतात. तसेच परिस्थितीनुसार वाहतुकीवर निर्बंध लागू करण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
-------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी