
* पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
* राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून मदतीचा ओघ सुरु
* गोरेगावमधील नेस्को येथे पार पडणार शिवसेनेचा दसरा मेळावा
मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.) - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांसाठी समर्पित केला आहे. पक्षाकडून गुरुवारी दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज करण्यात आला. या टिझरमध्ये दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, भगवा खांद्यावर घेऊन शिवसैनिक बांधावर जाईल. परिस्थिती गंभीर आहे पण पाठीशी उभा राहणारा शिवसैनिक खंबीर आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेचे मुख्ये नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. येत्या मंगळवारी, २० ऑक्टोबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता गोरेगावमधील नेस्को येथे शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच म्हटले आहे. संकटग्रस्त शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी शिवसेनेकडून वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरु आहे. शिवसेनेकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना २५ हजार सायलकलींचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पत्नींना २५ हजार शिलाई मशीनचे वितरण सुरु आहे. त्याशिवाय दसऱ्यापूर्वीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचे वाटप आणि आनंदाचा शिधा शिवसेनेकडून वितरित केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात दुष्काळातील शिवसेनेच्या मदतीबाबत सविस्तर बोलणार आहेत. या मेळाव्यात त्यांच्याकडून शिवसैनिकांना दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करणारा राज्यस्तरीय कार्यक्रम दिला जाईल.
गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पूर संकटात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. दसऱ्याचे तोरण लावण्यासाठी शिवसैनिक शेतकऱ्यांच्या घरी गेले होते. लाडक्या बहिणींसाठी पक्षाने मदतीचा हात पुढे केला होता. दसऱ्यापूर्वीच अन्नधान्याची पाकिटे शिवसेनेने शेतकऱ्यांच्या घरी पोहोचवली होती. यंदाही बळीराजा संकटात असून त्यासाठी शिवसेना राज्यभरात विविध उपक्रम राबवत आहे. दुष्काळग्रस्तांना समर्पित केलेल्या दसरा मेळाव्यातून शिवसेनेची शेतकऱ्यांविषयीची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी