
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानकडून होणाऱ्या सीमापार दहशतवादाबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. पाकिस्तानकडून भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास भारताकडून त्याला अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. भारताच्या सांस्कृतिक परंपरेत संवाद, सहअस्तित्व आणि वादांचे शांततापूर्ण निराकरण यांना महत्त्व आहे. मात्र, भारताच्या शांततेच्या भूमिकेला कमजोर समजण्याची चूक कोणीही करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी दिल्ली येथे आयोजित ‘टाइम्स नेटवर्क डिफेन्स कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’, बालाकोट हवाई हल्ले आणि सर्जिकल स्ट्राइक या केवळ लष्करी कारवाया नव्हत्या, तर दहशतवादाविरोधातील भारताच्या धोरणात झालेल्या निर्णायक बदलाचे प्रतीक होत्या. भारत आता केवळ राजनैतिक निषेध नोंदवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर दहशतवादाचा त्याच्या उगमस्थानीच नायनाट करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे.ते म्हणाले की, २०१४ पासून बहुतांश दहशतवाद्यांचा सक्रिय कालावधी एका वर्षापेक्षा कमी झाला आहे. भारताविरुद्ध शस्त्रे उचलणाऱ्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून वर्षभराच्या आत खात्मा केला जात आहे. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, शांतता टिकवून ठेवण्यासाठी सामर्थ्य आणि क्षमता आवश्यक असते. भारताला शांतता हवी आहे; मात्र देशाच्या संरक्षणासाठी गरज पडल्यास युद्धाला सामोरे जाण्यासही भारत पूर्णपणे सज्ज आहे.
गेल्या १२ वर्षांत भारताच्या संरक्षण क्षेत्रात व्यापक आणि संरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज संरक्षण क्षेत्रातील सर्व सार्वजनिक उपक्रम (डीपीएसयू) नफ्यात कार्यरत आहेत आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला नवी गती मिळाली आहे. संरक्षण सामग्रीच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यापासून ते अत्याधुनिक संरक्षण प्रणालींचे देशातच उत्पादन करण्यापर्यंत भारताने मोठी प्रगती केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्याबरोबरच जागतिक सुरक्षेत योगदान देणारी स्वावलंबी संरक्षण व्यवस्था विकसित करण्यावर भारताचा भर आहे.
राजनाथ सिंह म्हणाले, “शांततेप्रती आमची वचनबद्धता अढळ आहे; मात्र कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. शांततेला प्राधान्य देणारा, सुरक्षेबाबत सतर्क असलेला आणि आपले सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता व राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यास सक्षम असलेला भारत घडवणे, हे आमचे ध्येय आहे.”
बदलत्या सुरक्षा परिस्थितीचा उल्लेख करताना संरक्षणमंत्र्यांनी संकरित युद्ध, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि तीव्र स्वरूपाच्या संघर्षांच्या वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता व सज्जता राखण्याची गरज अधोरेखित केली. डिजिटल युगात निर्माण होणारी सुरक्षा आव्हाने अधिक गुंतागुंतीची होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.राजनाथ सिंह यांनी सुरक्षेसमोरील पाच प्रमुख धोक्यांचा उल्लेख केला. यामध्ये चुकीची माहिती पसरवणे, अस्थिरता निर्माण करणे, कामकाजात अडथळे आणणे, फसवणूक करणे आणि विध्वंस घडवून आणणे यांचा समावेश आहे.
ते म्हणाले की, दहशतवाद आता केवळ संघटित दहशतवादी गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. एकट्याने कट्टरपंथी विचारसरणी स्वीकारून हल्ले करणाऱ्या व्यक्ती आणि तथाकथित ‘व्हाइट कॉलर दहशतवाद’ यांच्याकडूनही धोका वाढत आहे. अशा प्रकारच्या दहशतवादात समाजातील सुशिक्षित किंवा प्रतिष्ठित पार्श्वभूमीच्या व्यक्तींचा सहभाग असू शकतो. या बदलत्या परिस्थितीत कट्टरपंथी विचारसरणीकडे झुकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणे आणि संभाव्य दहशतवादी हल्ले वेळीच रोखणे, हे सुरक्षा यंत्रणांसमोरील मोठे आव्हान बनले असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
संरक्षण मंत्र्यांनी प्रवासी विमान पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या एका सह-वैमानिकाच्या अलीकडील घटनेचाही उल्लेख केला.कॅप्टन स्मित मच्छर यांचा उल्लेख करताना ते म्हणाले की, त्यांनी आपला जीव धोक्यात घालून एक मोठा दहशतवादी हल्ला टाळण्यात भूमिका बजावली.ते म्हणाले की, ही घटना एकट्या हल्लेखोरांकडून निर्माण होणारा धोका दर्शवते. यातून हेही दिसून येते की, एखाद्या व्यक्तीची सतर्कता आणि धैर्य द्वेषाने प्रेरित झालेल्यांचे कट उधळून लावू शकते. त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सुरक्षा यंत्रणांसोबतच जागरूक आणि जबाबदार नागरिकांच्या सहभागाच्या महत्त्वावरही भर दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode