
लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे येथील स्व. भक्ती बर्वे इनामदार करंडक दोन अंकी नाट्यस्पर्धेत लातूरच्या माजी विद्यार्थी संघ, जयक्रांती अध्यापक महाविद्यालयाच्या ‘टू इज कंपनी’ या नाटकाने दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. सांघिक पारितोषिकासह वैयक्तिक सहा पारितोषिके अशी एकूण सात पारितोषिके मिळवत लातूरच्या संघाने मराठवाड्याचा झेंडा पुण्याच्या रंगभूमीवर अभिमानाने फडकवला.
स्पेशल ४० फेसबुक ग्रुप, पुणे आणि ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून सहभागी झालेल्या ३३ नाटकांच्या चित्रित सादरीकरणांची प्राथमिक फेरी घेण्यात आली. त्यातून अंतिम फेरीसाठी नऊ नाटकांची निवड करण्यात आली. या फेरीत मुंबई, ठाणे, पुणे येथील तीन संघांसह नागपूर, रत्नागिरी, बुलढाणा आणि लातूर येथील संघ सहभागी झाले होते.
चुरशीच्या अंतिम फेरीत नाट्यविभोर, पुणे या संस्थेच्या ‘रमा आणि रॅमी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. लातूरच्या ‘टू इज कंपनी’ या नाटकाने द्वितीय, तर मुशाफिरी, पुणे या संस्थेच्या ‘ती आणि ती’ या नाटकाने तृतीय क्रमांक मिळवला. ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
‘उन्हातलं चांदणं’ या नाटकानंतर पुण्याच्या रंगभूमीवर लातूरच्या नाट्यसंघाने पुन्हा एकदा आपली छाप उमटवली आहे. मनोज कोल्हटकर लिखित आणि ॲड. शैलेश गोजमगुंडे दिग्दर्शित ‘टू इज कंपनी’ या नाटकाला सांघिक द्वितीय क्रमांकासह विविध वैयक्तिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या नाटकासाठी मनोज कोल्हटकर यांना लेखनाचे द्वितीय पारितोषिक, ॲड. शैलेश गोजमगुंडे यांना दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक, गुणवंत (सुरेश) सूर्यवंशी यांना प्रकाशयोजनेचे प्रथम पारितोषिक, ॲड. बालाजी म्हेत्रे यांना नेपथ्याचे द्वितीय पारितोषिक, ॲड. हंसराज साळुंके यांना पुरुष अभिनयाचे द्वितीय पारितोषिक, तर राजीव गड्डीमे यांना सहअभिनेत्याचे पारितोषिक मिळाले.
नाटकाचे संगीत संयोजन अक्षय बाहेती यांनी केले, तर रंगभूषेची जबाबदारी सचिन उपाध्ये यांनी सांभाळली. महाराष्ट्रातील अग्रगण्य शहरांतील नाट्यसंघांशी स्पर्धा करत लातूरच्या कलाकारांनी मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
या नाट्यप्रयोगासाठी निर्मिती सहाय्य प्राचार्य प्रशांत घार आणि योगीराज पुणेकर यांचे लाभले. तसेच अजय गोजमगुंडे, सुधीर गोजमगुंडे, रघुराज बाहेती, गणपत कुलकर्णी, ॲड. सतीश मुचळंबकर, बालरंगभूमी परिषद लातूरचे अध्यक्ष रणजित आचार्य, विजय गायकवाड आणि सलीम पठाण यांचे विशेष सहकार्य मिळाले. लातूरच्या नाट्यसंघाने पुण्यात मिळवलेल्या या यशाबद्दल शहरातील रसिक आणि नाट्यप्रेमींकडून कलाकारांचे अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis