
अमरावती, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरातील ओसवाल भवन येथे गरबा पाहण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अमरावती शहर पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत अवघ्या २४ तासांच्या आत बालकाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात ३८ वर्षीय महिलेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि राजापेठ पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही कारवाई यशस्वी झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर रोजी फिर्यादी महिला शेजारील महिलेसोबत आपल्या पाच वर्षीय मुलाला घेऊन ओसवाल भवन येथे गरबा पाहण्यासाठी गेली होती. गरब्याच्या मंडपात शेजारच्या एका मुलासोबत आपल्या मुलाला खुर्चीवर बसवून ती गरबा खेळण्यासाठी गेली. काही वेळाने परत येऊन पाहिले असता मुलगा परिसरात दिसून आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने कोणीतरी फूस लावून त्याचे अपहरण केल्याची तक्रार राजापेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा गुन्हा नोंदविण्यात आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार राजापेठ पोलिस ठाण्याची चार आणि गुन्हे शाखेची सहा अशी दहा पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना सुरुवातीला एका व्यक्तीसोबत दुचाकीवर दिसणारे बालक फिर्यादीचे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास बालक आईसोबत गरब्याच्या मंडपाकडे जाताना दिसून आले.पुढील फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले असता, लाल साडी परिधान केलेली महिला बालकाला कडेवर घेऊन घाईघाईने जाताना दिसली. पोलिसांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि ऑटोस्टँड परिसरात शोधमोहीम राबवली. सीसीटीव्हीच्या आधारे महिलेचा माग काढत असताना ती राजापेठ रेल्वे अंडरपासच्या दिशेने गेल्याचे आढळले. पुढील तपासात ती हमालपुरा परिसरातील रहिवासी असल्याचे आणि नंतर माहेरी आमगाव, जिल्हा गोंदिया येथे गेल्याचे निष्पन्न झाले.
तांत्रिक माहितीच्या आधारे अमरावती रेल्वेस्थानक परिसरातून महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्या चौकशीत अपहृत बालक आमगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आमगाव पोलिसांच्या मदतीने बालकाला सुखरूप ताब्यात घेण्यात आले. संबंधित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३(४) अन्वये कलमवाढ करून तिला न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली. बालकाची सुखरूप सुटका झाल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस निरीक्षक वैभव पानसरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, अर्जुन कदम, अमोल देशमुख, चेतन गुल्हाने, चालक प्रभात पोकळे, राहुल दुबे आणि चेतन शर्मा यांच्यासह आदींनी सहभाग घेतला. तसेच अमरावती शहर गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांनीही या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी