
कोल्हापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। महावितरणच्या ‘नाट्यबहार’ या आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे २१ व २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या दोन दिवसीय स्पर्धेचा गुरुवारी सायंकाळी उत्साहात समारोप झाला. विविध सामाजिक विषयांवरील चार नाटकांच्या सादरीकरणातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील कलागुणांचा आविष्कार अनुभवायला मिळाला.
बक्षीस वितरण समारंभाला महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक परेश भागवत व अंकुर कावळे, कार्यकारी संचालक तथा पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे आणि नागपूर प्रादेशिक संचालक राजेश नाईक, समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्यासह परीक्षक म्हणून राज काझी, अजय धनवे, शुभांगी पाठक व राज कुबेर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक राजेंद्र पवार म्हणाले, ‘आव्हानात्मक परिस्थितीत दैनंदिन कामांची जबाबदारी सांभाळताना वीज कर्मचाऱ्यांनी आतील कलाकार आणि कला दोन्ही जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. अगदी व्यावसायिक नाटकांना साजेशी कामगिरी महावितरणचे कलाकार करत आहेत.’ अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी चारही नाटकांचे सखोल विश्लेषण करून रसिक म्हणून नाट्यरूपी मेजवानीचा आस्वाद घेतल्याचे सांगत सर्व कलाकारांचे कौतुक केले.
प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे परिमंडलाने नाट्यस्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. प्रादेशिक संचालक म्हणून सुनील काकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. मृदुला शिवदे व सौ. भक्ती जोशी यांनी सांभाळली. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी आभार मानले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कोकण प्रादेशिक विभागाचे ‘ओल्या भिंती’ आणि पुणे प्रादेशिक विभागाचे ‘समोरच्या घरात’, तर दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’ आणि नागपूर प्रादेशिक विभागाचे ‘थलाई कुथल’ ही नाटके सादर झाली. या नाट्यप्रयोगांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
*स्पर्धेचा संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे :*
*१. नाट्यनिर्मिती*
प्रथम क्रमांक – ‘थलाई कुथल’, नागपूर परिमंडल
द्वितीय क्रमांक – ‘समोरच्या घरात’, कोल्हापूर परिमंडल
*२. दिग्दर्शन*
प्रथम क्रमांक – प्रफुल्ल लांडे (‘थलाई कुथल’), नागपूर परिमंडल
द्वितीय क्रमांक – अमित बोकील (‘समोरच्या घरात’), कोल्हापूर परिमंडल
*३. नेपथ्य*
प्रथम क्रमांक – विठ्ठल पाटील (‘समोरच्या घरात’)
*४. प्रकाशयोजना*
द्वितीय क्रमांक – आशिष मेहता (‘समोरच्या घरात’)
*५. रंगभूषा व वेशभूषा*
द्वितीय क्रमांक – दत्तात्रय भणगे (‘समोरच्या घरात’)
*६. उत्कृष्ट अभिनेता*
प्रथम क्रमांक – जयतीर्थ सांगलीकर (श्रीरंग विजयकर), ‘समोरच्या घरात’
*७. उत्कृष्ट अभिनेत्री*
प्रथम क्रमांक – श्वेता सांगलीकर (अनुराधा), ‘समोरच्या घरात’
*८. उत्तेजनार्थ पारितोषिके*
पौर्णिमा पुरोहित (कृष्णाक्का) – ‘समोरच्या घरात’
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar