
कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रांमध्ये फिजिशियन्सचा उत्स्फूर्त सहभाग
नाशिक, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
: महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स (एमएपी) आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स नाशिक (एपीएन) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या राज्यस्तरीय ‘मॅपकाँन २०२६’ परिषदेला नाशिक येथील हॉटेल ‘ट्रीट’ येथे उत्साहात सुरुवात झाली. या परीषदेचे औपचारिक उद्घाटन शनिवारी (२४ ऑक्टोबर) होणार आहे. तत्पूर्वी कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रांमध्ये उपस्थित फिजिशियन्सने सहभागी होतांना मंथन घडविले. राज्यभरातून आलेल्या फिजिशियन्सचे स्वागत आयोजन समिती अध्यक्ष डॉ.नारायण देवगावकर, आयोजन समिती सचिव डॉ.समीर चंद्रात्रे व सहकार्यांनी केले.
डॉ.देवगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, २२ ऑक्टोबरला दोन महत्त्वपूर्ण कार्यशाळा पार पडल्या. वैद्यकीय क्षेत्रात वेगाने विस्तारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये वापर करण्यासंदर्भात हँड्स-ऑन कार्यशाळा पार पडली. यामध्ये डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. अनिकेत इनामदार आणि डॉ. आलोक मोदी यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच पॉइंट ऑफ केअर अल्ट्रासाउंड कार्यशाळा डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे झाली. फिजिशियन्ससाठी प्रत्यक्ष अल्ट्रासाउंड आणि टू-डी इकोच्या वापरावर आधारित हे विशेष सत्र झाले. डॉ. शांतनू सेनगुप्ता आणि डॉ. विनोद विजन यांनी याचे नेतृत्व केले. वैद्यकीय पदव्युत्तर (एमडी/डीएनबी) विद्यार्थ्यांसाठी १०० गुणांची बहुपर्यायी लेखी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली.
शुक्रवारी २३ ऑक्टोबरला मुख्य वैज्ञानिक सत्रे, तोंडी परीक्षा या उपक्रमांसह गोदावरी आरतीचा उपक्रम पार पला. गोदावरी, गौतमी आणि नंदिनी या तीन विविध सभागृहांमध्ये एकाच वेळी तज्ज्ञांची व्याख्याने व चर्चासत्रे सुरू झाली. हृदयरोग, अतिरक्तदाब आणि हार्ट फेल्युअरचे व्यवस्थापन, मधुमेह, लठ्ठपणा आणि नव्या इनक्रेटिन थेरपीचा वापर, क्षयरोग, डेंग्यू व इतर संसर्गजन्य आजारांची नवीन मार्गदर्शक तत्त्वे, आयसीयू व्यवस्थापन, सेप्सिस, क्रिटिकल केअर, संधिवात व न्यूरोलॉजी यांसारख्या विषयांवर देश-विदेशातील तज्ज्ञांनी विचार मांडले जात आहेत.
या परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नारायण देवगावकर, आयोजन समिती सचिव डॉ. समीर चंद्रत्रे, सायंटिफिक चेअरमन डॉ. यशपाल गोगटे, 'मॅप'चे अध्यक्ष डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. मुकुंद पेनूरकर, मानद सचिव डॉ. अंजली राजाध्यक्ष आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स नाशिक व उत्तर महाराष्ट्र फिजिशियन्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI