
कोल्हापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
उद्योगात यश मिळविण्यासाठी मोठे ध्येय, जोखीम घेण्याची तयारी, जिद्द आणि आर्थिक शिस्त आवश्यक असल्याचे प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड, सोलापूरचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यतीन सुभाष शाह यांनी सांगितले.
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या स्मॅक ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मॅक चे अध्यक्ष जयदीप चौगले होते. कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हेलियन येथील मधुसूदन हॉलमध्ये ही सभा झाली.
प्रिसिजनच्या उद्योगप्रवासातील संघर्षाविषयी बोलताना शाह यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून मान्यता मिळविण्यासाठी लागलेल्या प्रदीर्घ कालावधीचा उल्लेख केला. टोयोटाची मान्यता मिळविण्यासाठी तीन वर्षे आणि १३ ऑडिट्सना सामोरे जावे लागले, तर मारुतीची मान्यता मिळविण्यासाठी १५ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. “कन्व्हिक्शन पाहिजे, जिद्द पाहिजे,” असे सांगत त्यांनी सातत्य आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रिसिजन समूह महिन्याला सुमारे १० लाख कॅमशाफ्ट तयार करतो, मात्र जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत ही क्षमता केवळ नऊ टक्के असल्याने वाढीस मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले. मारुतीला वर्षाला सुमारे तीन लाख कॅमशाफ्टचा पुरवठा केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. कंपनीतील पारदर्शकतेविषयी बोलताना, “आमच्या कारखान्यात कोणीही, कुठेही जाऊ शकतो. गेली ३२ वर्षे मी माहिती शेअर करतोय; काही वाईट घडलेलं नाही. ही पारदर्शकता आमचं हॉलमार्क आहे,” असे ते म्हणाले.
इंटर्नल कम्बशन इंजिनचे भविष्य संपणार असल्याची चर्चा सुरू असतानाही प्रिसिजनने इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) क्षेत्रात प्रवेश केल्याचे शाह यांनी सांगितले. नेदरलँड्समधील कंपनीचे अधिग्रहण केले, तेव्हा तिची उलाढाल ३० लाख युरो होती. चार वर्षांत ती वाढवून २.५ कोटी युरोंपर्यंत नेल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशातील व्यवसायविस्ताराविषयी बोलताना त्यांनी पाश्चिमात्य देशांत अधिग्रहण करण्याबाबत सावधगिरीचा सल्ला दिला. “पर्यटक म्हणून युरोप सुंदर दिसतो; पण व्यवसाय करायला अत्यंत कठीण आहे,” असे ते म्हणाले.
तरुण पिढीला मार्गदर्शन करताना शाह यांनी वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कौशल्य, अनुभव आणि आर्थिक स्थैर्य मिळविण्याचे महत्त्व सांगितले. “जेन-झीसाठी चार-पाच वर्षांची खिडकी असते. वयाच्या ३१-३२ पर्यंत स्थिर झाला नाहीत, तर हरवलात. स्थैर्य लवकर यावं लागतं,” असे ते म्हणाले. उद्योजकांनी मोठी आव्हाने स्वीकारावीत, सतत शिकत राहावे आणि समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजाला योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. वयाच्या पन्नाशीनंतर जीवनशैलीत बदल केल्याचे सांगत “फिट राहणं सर्वात महत्त्वाचं,” असा सल्लाही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar