
रायगड, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।
महिला सक्षमीकरण, स्थानिक लघुउद्योगांना प्रोत्साहन आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेच्या वतीने चंपावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने रेवदंडा येथे ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर ते रविवार, १ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवसांत भरणाऱ्या या बाजारपेठेत स्थानिक उद्योजकांचे ४० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून नागरिकांना विविध स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, विक्री कौशल्य वाढविणे आणि व्यवसायवृद्धीसाठी संधी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
‘अमृत’ संस्थेमार्फत विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांसह स्थानिक लघुउद्योजकांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविता येणार आहेत. ग्राहकांना दिवाळीसाठी आवश्यक वस्तू वाजवी दरात खरेदी करता येतील. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच उद्योजकांच्या उत्पन्नवाढीलाही मदत होणार आहे.
‘अमृत’ संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. आयोजनासाठी चंपावती पतसंस्थेचे अध्यक्ष व व्यावसायिक विश्वास जोशी, प्रवर्तक दिलीप भाई पटेल तसेच दोन्ही संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी विशेष योगदान देत आहेत.
रेवदंडा परिसरासह रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान या बाजारपेठेला भेट देऊन स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या व्यवसायवृद्धीस हातभार लावावा, असे आवाहन शैलेश मराठे, मंगेश ढेबे आणि चंपावती पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अमृत, रायगड जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी ९११२२२८७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)