प्रभासच्या ‘फौजी’चा टीझर प्रदर्शित; ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार अभिनेता
मुंबई, २४ ऑक्टोबर (हि.स.)। अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, चाहत्यांसाठी ही खास भेट ठरली आहे. ‘फाइल नंबर २५’ या शीर्षकाखाली प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रभास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश
Fauji


मुंबई, २४ ऑक्टोबर (हि.स.)। अभिनेता प्रभासच्या आगामी ‘फौजी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, चाहत्यांसाठी ही खास भेट ठरली आहे. ‘फाइल नंबर २५’ या शीर्षकाखाली प्रदर्शित झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रभास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या निर्भीड योद्ध्याच्या भूमिकेत दिसत आहे.

प्रभासचा दमदार अंदाज आणि आक्रमक व्यक्तिमत्त्व यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. टीझरमध्ये त्याचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळतो. ब्रिटिशांना आव्हान देताना दिसणारा प्रभास आपल्या दमदार संवादांनी लक्ष वेधून घेतो.

या टीझरमध्ये स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस आणि जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांच्या भेटीचा प्रसंगही दाखवण्यात आला आहे. भारताला ब्रिटिश सत्तेपासून मुक्त करण्यासंदर्भातील चर्चेची झलक यात पाहायला मिळते. ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देणाऱ्या एका बंडखोर योद्ध्याची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. प्रभास आपल्या दमदार संवादातून ब्रिटिशांना ललकारताना म्हणतो, “अरे ओ फिरंगी, मैं तेरा खून लूंगा और आजादी भी.” त्याचा आक्रमक अंदाज आणि हा संवाद यामुळे टीझर अधिक लक्षवेधी ठरला आहे.

हनु राघवपुडी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फौजी’ या पीरियड अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. हा चित्रपट १९ मार्च २०२७ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रभासच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आणखी एका बहुप्रतीक्षित ‘कल्की २८९८ एडी २’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनीही एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये प्रभास चित्रपटाच्या सेटवर दिसत असून, दिग्दर्शक नाग अश्विन त्याला एका दृश्यासाठी मार्गदर्शन करताना पाहायला मिळतात. वाढदिवसाच्या निमित्ताने दोन्ही चित्रपटांची झलक पाहायला मिळाल्याने प्रभासच्या चाहत्यांचा उत्साह आणखी

वाढला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande