भीमा नदीपात्रात ४,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
सोलापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। उजनी धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवून २,९०० क्युसेक करण्यात आला आहे. याशिवाय पॉवर हाऊसमधून सुरू असलेल्या १,६०० क्युसेक विसर्गासह भीमा नदीपात्रात आता एकूण ४,५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा
ujani


सोलापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

उजनी धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवून २,९०० क्युसेक करण्यात आला आहे. याशिवाय पॉवर हाऊसमधून सुरू असलेल्या १,६०० क्युसेक विसर्गासह भीमा नदीपात्रात आता एकूण ४,५०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पाणीप्रवाहात वाढ झाली आहे.

यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर बनले आहे. पावसाअभावी भीमा नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमधून पाणी सोडण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला यांसह भीमा नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याची गरज नदीतील पाण्यावर अवलंबून आहे. नदीपात्र कोरडे पडल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. आता सोडण्यात आलेले पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बंधाऱ्याजवळ पोहोचेपर्यंत विसर्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, हिळ्ळीपर्यंत भीमा नदीपात्र कोरडे असल्याने वडापूर बंधाऱ्यापर्यंत उजनीचे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात जाणे, पोहण्यासाठी पाण्यात उतरणे, जनावरांना नदीत नेणे तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ थांबणे टाळावे. नदीकाठच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनीही पाण्याच्या वाढत्या प्रवाहाकडे लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घ्यावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande