
नांदेड, 25 ऑक्टोबर (हिं.स.)
नांदेडजिल्ह्यात कमी पर्जन्यमान आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीचे अर्थकारण अडचणीत आले असताना, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने सुधारित रब्बी ज्वारी बियाणे मिनिकिट वितरण योजना हाती घेतली आहे. कमी पाण्यात उत्पादन देणारे तसेच जनावरांसाठी दर्जेदार चारा उपलब्ध करून देणाऱ्या ज्वारी पिकाखालील क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने सन 2026-27 या वर्षासाठी नांदेड जिल्ह्याला 5 हजार 240 बियाणे मिनिकिटांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्याला एकूण 209.60 क्विंटल बियाण्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक मिनिकिटमध्ये चार किलो प्रक्रिया केलेले सुधारित वाणाचे ज्वारी बियाणे, जैविक खताची पाकिटे आणि पीक लागवड तंत्रज्ञानाची माहिती देणारे माहितीपत्रक समाविष्ट असणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सुधारित वाणाच्या बियाण्यांचा लाभ मिळण्यासोबतच जनावरांसाठी चारा उपलब्धतेलाही हातभार लागणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची निवड महाडीबीटी संकेतस्थळावर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी विलंब न करता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी. निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांना 10 नोव्हेंबर 2026 पूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने बियाणे मिनिकिटांचे वितरण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेत पेरणीचे नियोजन करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis