सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी कोरडी; पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर
सोलापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)। पावसाने पाठ फिरवल्याने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, ऑक्टोबर महिन्यातच भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदीतील पाणी आटल्याने पंढरपूरसह अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये पिण
सोलापूर जिल्ह्यात भीमा नदी कोरडी; पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर


सोलापूर, 25 ऑक्टोबर (हिं.स.)।

पावसाने पाठ फिरवल्याने सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, ऑक्टोबर महिन्यातच भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदीतील पाणी आटल्याने पंढरपूरसह अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर शेतीसाठी पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता याबाबतही चिंता वाढली आहे.

उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी कर्नाटक सरकारने उमराणी बॅरेजमध्ये अडवल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात पाणीटंचाई अधिक तीव्र झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. कर्नाटकच्या हद्दीत नदीकाठच्या भागात १६ तास वीजपुरवठा उपलब्ध असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, नदीतील पाणी पुढे वाहून जाण्याचे प्रमाण कमी झाल्याने महाराष्ट्रातील नदीकाठच्या गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगीपासून कुडलसंगमपर्यंत भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याचे चित्र आहे. नदीतील पाणीपातळी घटल्यामुळे मंद्रूप, कुरघोट, टाकळी, बरूर, माळकवठे, चिंचपूर आणि औज (मंद्रूप) या गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे जॅकवेल उघडे पडले आहेत. त्यामुळे या गावांना पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.पाणीटंचाईचा फटका शेतीला बसत असून, शेतातील उभी पिके करपू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणेही शेतकऱ्यांसमोर आव्हान ठरत आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर सादेपूर-उमराणी बॅरेजचे दरवाजे उघडून नदीतून पाणी पुढे सोडण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत दोन्ही जिल्हा प्रशासनांमध्ये समन्वय झाल्यास दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, बॅरेजमधून पाणी सोडण्याबाबतचा निर्णय, पाण्याचे प्रमाण आणि प्रत्यक्ष पाणी गावांपर्यंत पोहोचण्याचा कालावधी याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande