शेअर बाजारात जिओ प्लॅटफॉर्म्सची दमदार सुरुवात; आयपीओ गुंतवणूकदारांना मोठा नफा
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। डिजिटल कनेक्टिव्हिटी, डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञानविषयक उपाययोजना पुरवणाऱ्या देशातील आघाडीच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या कंपनीच्या समभागांनी आज शेअर बाजारात दमदार सुरुवात करून आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकद
IPO Listing Jio Platforms


IPO Listing Jio Platforms


नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। डिजिटल कनेक्टिव्हिटी, डिजिटल सेवा आणि तंत्रज्ञानविषयक उपाययोजना पुरवणाऱ्या देशातील आघाडीच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड या कंपनीच्या समभागांनी आज शेअर बाजारात दमदार सुरुवात करून आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आनंदित केले. आयपीओअंतर्गत कंपनीचे समभाग १,११९ रुपये प्रति समभाग या दराने जारी करण्यात आले होते. आज मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन्ही प्रमुख शेअर बाजारांमध्ये कंपनीच्या समभागांची नोंदणी २१.४ टक्क्यांच्या भरघोस वाढीसह १,३५८ रुपयांच्या पातळीवर झाली. या दमदार सुरुवातीसह जिओ प्लॅटफॉर्म्स ही रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सूचिबद्ध कंपनी बनली आहे.

नोंदणीनंतर गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे कंपनीच्या समभागाने काही वेळातच आणखी उसळी घेत १,३७५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. बाजारात सातत्याने सुरू असलेल्या खरेदी-विक्रीदरम्यान सकाळी ११.१५ वाजेपर्यंतचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर कंपनीचा समभाग १,३५८ रुपयांच्या पातळीवर मजबूत स्थितीत होता. अशा प्रकारे आतापर्यंतच्या व्यवहारात कंपनीच्या आयपीओ गुंतवणूकदारांना प्रति समभाग २३९ रुपये म्हणजेच २१.३६ टक्क्यांचा थेट आणि मोठा नफा झाला आहे.

या कंपनीचा ३०,१८७.६५ कोटी रुपयांचा मोठा आयपीओ २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होता. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा आयपीओ एकूण १६.३६ पट अधिक अभिदानासह पूर्ण झाला. यामध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) राखीव असलेल्या हिस्सा विभागाला अँकर गुंतवणूकदारांचा हिस्सा वगळता ७०.५२ पट अभिदान मिळाले. त्याचप्रमाणे बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयआय) राखीव असलेल्या हिस्सा विभागाला १३.७२ पट अभिदान मिळाले. यामध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या उच्च संपत्तीधारक गुंतवणूकदारांच्या (एचएनआय) विभागाला १५.६३ पट, तर १० लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करणाऱ्या उच्च संपत्तीधारक गुंतवणूकदारांच्या विभागाला ९.९० पट अभिदान मिळाले. याशिवाय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या हिस्सा विभागाला २.७६ पट, भागधारकांच्या श्रेणीला ७.२५ पट आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या हिस्सा विभागाला २.५८ पट अभिदान मिळाले.

या आयपीओअंतर्गत प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण २७ कोटी समभाग जारी करण्यात आले आहेत. हा संपूर्ण आयपीओ १०० टक्के नवीन समभाग जारी करण्यावर आधारित होता. म्हणजेच समभाग विक्रीच्या (ऑफर फॉर सेल) माध्यमातून प्रवर्तकांनी त्यांच्या मालकीचे कोणतेही समभाग विकले नाहीत. आयपीओअंतर्गत नवीन समभाग जारी करून उभारलेल्या निधीपैकी २७,५०० कोटी रुपये कंपनीची महत्त्वपूर्ण उपकंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने घेतलेल्या काही थकीत कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी (पूर्वपरतफेड) वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि आयपीओवरील खर्चाची भरपाई करण्यासाठी वापरली जाणार आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडच्या आर्थिक स्थितीबाबत सांगायचे झाल्यास, भांडवली बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) सादर केलेल्या कागदपत्रांमधील आकडेवारीनुसार, गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला २१,४३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हा नफा वाढून २६,१२०.३० कोटी रुपयांवर पोहोचला. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा वाढून ३०,०५२.७० कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला. याशिवाय, चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीअखेर म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत कंपनीला ७,७६४.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

या कालावधीत कंपनीच्या महसुलातही सातत्याने वाढ नोंदवण्यात आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला १,१०,१७५.४० कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळाला होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तो वाढून १,२९,३३३ कोटी रुपयांवर पोहोचला. त्यानंतर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीच्या एकूण महसुलात आणखी वाढ होऊन तो १,४९,७५९.१० कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचला. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीअखेर म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत कंपनीला ४०,१९७.९० कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळाला होता.

या कालावधीत कंपनीवरील कर्जाच्या बोजामध्ये चढ-उतार होत राहिले. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अखेरीस कंपनीवर एकूण ५४,३४८.९० कोटी रुपयांचे कर्ज होते. पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ते वाढून ७३,०६०.३० कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. मात्र, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीवरील कर्जाचा बोजा कमी होऊन ७०,७८१ कोटी रुपये राहिला. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीअखेर म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत कंपनीवरील एकूण कर्जाचा बोजा आणखी कमी होऊन ६१,३७२.२० कोटी रुपये नोंदवण्यात आला.

कंपनीच्या एकूण मालमत्तेतही या कालावधीत सातत्याने वाढ झाली. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अखेरीस जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडची एकूण मालमत्ता ५,३९,५८०.४० कोटी रुपयांच्या पातळीवर होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ती वाढून ५,८१,२३३.८० कोटी रुपये झाली. त्यानंतर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीची एकूण मालमत्ता वाढून ६,१५,५९४ कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीअखेर कंपनीची एकूण मालमत्ता ६,२२,९०५.३० कोटी रुपये नोंदवण्यात आली.

राखीव निधी आणि अतिरिक्त शिल्लक रकमेचा विचार करता, या बाबतीतही कंपनीने सातत्याने भरीव वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अखेरीस कंपनीचा राखीव निधी आणि अतिरिक्त शिल्लक रक्कम २,६८,९२७.१० कोटी रुपये होती. पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ती वाढून २,९५,०८३.४० कोटी रुपये झाली. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अखेरीस कंपनीचा राखीव निधी आणि अतिरिक्त शिल्लक रक्कम वाढून ३,२५,०७४.४० कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीअखेर म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत ही रक्कम आणखी वाढून ३,३२,८३९.५० कोटी रुपये झाली होती.

याच कालावधीत कंपनीच्या निव्वळ संपत्तीतही सातत्याने मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीची निव्वळ संपत्ती २,७७,८६६.१० कोटी रुपयांच्या पातळीवर होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ती वाढून ३,०४,०२२.४० कोटी रुपये झाली. मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीची निव्वळ संपत्ती वाढून ३,३४,०१३.४० कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीअखेरीस कंपनीची निव्वळ संपत्ती ३,४१,७७८.५० कोटी रुपये नोंदवण्यात आली.

त्याचप्रमाणे कंपनीच्या व्याज, कर, घसारा आणि अमॉर्टायझेशनपूर्व कमाईत (ईबीआयटीडीए) सातत्याने मोठी वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीची ईबीआयटीडीए ५४,९५८.७० कोटी रुपयांच्या पातळीवर होती. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ती वाढून ६४,१७० कोटी रुपये झाली. त्यानंतर मागील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती ७६,२५५.४० कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली. चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीअखेर म्हणजेच ३० जून २०२६ पर्यंत कंपनीची ईबीआयटीडीए २०,८६४.५० कोटी रुपये नोंदवण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande