
मुंबई, २९ ऑक्टोबर, (हिं.स.)। दिग्दर्शक प्रियदर्शन आपल्या आगामी चित्रपटासाठी पुन्हा एकदा अभिनेता अक्षय कुमारसोबत काम करणार आहेत. या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून भूमी पेडणेकरची निवड करण्यात आली असून, प्रियदर्शन यांनी तिच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे. अक्षय आणि भूमी याआधी २०१७ मधील 'टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि २०२२ मधील 'रक्षा बंधन' या चित्रपटांत एकत्र दिसले होते. सुमारे नऊ वर्षांच्या कालावधीत हे त्यांचे तिसरे एकत्र काम असेल.
प्रियदर्शन यांच्या कारकिर्दीतील हा ९९ वा चित्रपट असून, याची निर्मिती रमेश तौरानी करत आहेत. १९७० च्या दशकातील पार्श्वभूमीवर आधारित या विनोदी चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्याच अवतारात दिसणार आहेत. त्यांचे पात्र काहीसे विचित्र आणि लहरी असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अन्नू कपूर आणि राजपाल यादव देखील सहभागी होण्याची चर्चा आहे, मात्र त्यांच्या भूमिकांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असून, राजस्थानची जंगले, भोपाळ आणि मुंबई अशा विविध ठिकाणी तीन महिन्यांपर्यंत चित्रीकरण चालणार आहे.
विशेष म्हणजे, प्रियदर्शन आणि अक्षय कुमार जोडीने यापूर्वी अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. यावर्षीही ते 'भूत बंगला' आणि 'हैवान' या प्रकल्पांसाठी पुन्हा एकत्र आले आहेत. आता या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढू लागली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर