
रायगड, 03 ऑक्टोबर (हिं.स.)। दुबईहून इस्रायलच्या दिशेने निघालेल्या फ्लायडुबईच्या विमानात कॉकपिटमध्ये निर्माण झालेल्या गंभीर प्रसंगाला धैर्याने सामोरे जात कॅप्टन स्मित मच्छार यांनी विमान सुरक्षितपणे उतरविल्याची घटना समोर आली आहे. या प्रसंगामुळे प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या कॅप्टन मच्छार यांचे माथेरानशी असलेले जुने नातेही चर्चेत आले आहे.
३० सप्टेंबर रोजी फ्लायडुबईचे FZ1073 हे विमान दुबईहून इस्रायलच्या दिशेने जात असताना ओमानी सहवैमानिकाने कॉकपिटमध्ये कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात येते. हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही त्यांनी प्रसंगावधान राखत विमानावरील नियंत्रण कायम ठेवले. दरम्यान, कॉकपिटचा दरवाजा उघडण्याची संधी निर्माण झाल्यानंतर क्रू सदस्य आणि प्रवाशांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले.
यानंतर विमानाचा मार्ग बदलून सौदी अरेबियातील तबूक येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील १७४ प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. संकटाच्या क्षणी कॅप्टन मच्छार यांनी दाखविलेल्या धैर्याची चर्चा होत आहे.
कॅप्टन स्मित मच्छार यांचे मुंबईतील घाटकोपरशी वास्तव्य असले तरी त्यांच्या बालपणीच्या आठवणी माथेरानशी जोडलेल्या आहेत. सुट्टीच्या काळात ते माथेरान येथे मामा उमेशभाई दुबल यांच्या ‘गुजरात भवन’ हॉटेलमध्ये येत असत. माथेरानच्या लालमातीशी जुळलेले हे नाते आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आकाशातील संकटाला सामोरे जाताना दाखविलेल्या धैर्यामुळे रायगडशी संबंधित या वैमानिकाची कामगिरी विशेष ठरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)