नाशिक - विल्होळीतील कंपनीला भीषण आग
Massive fire breaks out at company in Vilholi
Massive fire breaks out at


फायर प्रोटेक्शन यंत्रणाच नसल्याचे उघड

नाशिक, 03 ऑक्टोबर (हिं.स.)।

विल्होळी परिसरातील रोड नं. १०२ वरील अरमान वेलगेज कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली. आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी मुख्य अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाली.

प्राथमिक माहिती मिळताच नाशिक महानगर पालिकेच्या सिडको केंद्राचा एक बंब तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आला. घटनास्थळावरुन विजय कुंभार यांचा फोन आला की आग मोठी असून दोन किंवा तीन फायर टेंडर पाठवा. नियंत्रण कक्षाने त्यांना सांगितले की सिडकोचा बंब पाठविला आहे. मदत मागितल्याने आणखी दोन बंब रवाना करण्यात आले.

सदर आग दोन बंबाच्या सहाय्याने आटोक्यात आणून पूर्णपणे विझविण्यात आली. या कॉलवर फायर ऑफिसर के. टी. पाटील, ए. एस. पेटले, वि. दा. घनपीस, पी. जी. शिर्के आदी हजर होते.

घटनास्थळी पाहणी केली असता या ठिकाणी कोणतीही फायर प्रोटेक्शन सुविधा नव्हती.

मनपा अग्निशामक विभागाने कंपनी मालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यापुढे यदाकदाचित मोठी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी कंपनी मालक जबाबदार राहतील, अशी तंबी देण्यात आली आहे. या घटनेमुळे विल्होळी औद्योगिक वसाहतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande