गांधी जयंतीनिमित्त शिरोली औद्योगिक क्षेत्रात स्वच्छता मोहीम : स्वच्छता दूतांचा गौरव
कोल्हापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.) | महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिरोली औद्योगिक क्षेत्रात शनिवारी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ८ ते ११
गांधी जयंती निमित्त स्वच्छता दूतांचा सत्कार


कोल्हापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.) | महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिरोली औद्योगिक क्षेत्रात शनिवारी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ८ ते ११ या वेळेत उद्योजक, अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी आपल्या कारखान्यांसमोरील रस्ते व परिसराची स्वच्छता केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दूतांचा गुलाबपुष्प व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे छायाचित्र देऊन गौरव करण्यात आला.

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक म्हणाले, “स्वच्छता अभियानात उद्योजक आणि कामगारांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया या दिशेने आपण पुढे जात आहोत. सावली केअर सेंटरमार्फत तिन्ही औद्योगिक क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, सर्व क्षेत्रांसाठी एकत्रित कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. बाहेर कचरा होऊ नये, त्याचे दररोज वर्गीकरण व योग्य पद्धतीने निर्गती व्हावी, यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.” ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही नाईक यांनी सांगितले. त्यानुसार शिरोली औद्योगिक क्षेत्रातील स्वच्छता दूतांचा प्रतिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.

विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड म्हणाले, “४ जून २०१९ रोजी पहिल्या स्वच्छता मोहिमेपासून सुरू झालेला हा उपक्रम आता आठव्या वर्षात पोहोचला आहे. तिन्ही औद्योगिक क्षेत्रांमध्ये २ ऑक्टोबर व ५ जून या दिवशी सातत्याने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. उद्योगाच्या आतील स्वच्छता ही आपली जबाबदारी आहेच, मात्र औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व परिसराची जबाबदारीही उद्योजक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वीकारून ती सातत्याने पार पाडली आहे.”

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख यांनी उद्योजक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. “एमआयडीसीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजकांनी स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. औद्योगिक क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने एमआयडीसी व औद्योगिक संघटना सकारात्मक आहेत,” असे त्यांनी सांगितले. स्वच्छता दूत हे आरोग्यदूतांप्रमाणेच समाजासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एमआयडीसीचे उपअभियंता अजयकुमार रानगे यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा उल्लेख केला. “स्वच्छतेतून माणूस आत्मिक शुद्धतेकडे आणि तेथून ईश्वरी शक्तीकडे वाटचाल करतो. स्वच्छता ही केवळ परिसरापुरती मर्यादित नसून जीवन समृद्ध करणारी प्रक्रिया आहे,” असे त्यांनी सांगितले.

स्मॅक चे चेअरमन जयदीप चौगुले म्हणाले, “स्मॅक आयटीआयचे विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहभागातून दर महिन्याला एका सोमवारी औद्योगिक परिसराची स्वच्छता केली जाते. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते. प्रत्येक उद्योजकाने आपला कारखाना तसेच कारखान्याबाहेरील परिसरही स्वच्छ ठेवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी स्मॅकचे संचालक प्रशांत शेळके, स्वीकृत संचालक भीमराव खाडे, निमंत्रित सदस्य विनय लाटकर, मोहन जाधव, अजिंक्य तळेकर, रामराजे बदाले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. आर. मातकर, ए. आर. पाटील, एमआयडीसीचे अधिकारी निलेश जाधव यांच्यासह त्यांची टीम आणि औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, अधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

‘स्वच्छ शिरोली, हरित शिरोली,सुंदर शिरोली’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत प्लास्टिक व इतर कचरा वेगवेगळा संकलित करण्यात आला.

संकलित कचरा वाहून नेण्याची व्यवस्था एमआयडीसीमार्फत करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande