बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम - डॉ. उमेश कानडे
कोल्हापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)| वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) आधुनिक तंत्रज्ञानाला स्वतःचे ज
‘मॅपकॉन-२०२६’ परिषदेचे उद्घाटन


कोल्हापूर, 03 ऑक्टोबर (हिं.स.)| वैद्यकीय क्षेत्र, औषधशास्त्र आणि तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली, तरी रोगाच्या अचूक निदानासाठी पॅथॉलॉजिस्टची भूमिका कायम महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या (एआय) आधुनिक तंत्रज्ञानाला स्वतःचे ज्ञान आणि अनुभवाची जोड देत कमी वेळेत अचूक निदान करण्यावर पॅथॉलॉजिस्टनी भर द्यावा, असे आवाहन इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट, महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी केले.

इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या ४७ व्या वार्षिक ‘मॅपकॉन-२०२६’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. माधव कोल्हटकर आणि डॉ. मीरा झवर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील एक हजारांहून अधिक पॅथॉलॉजिस्ट सहभागी झाले आहेत.

डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा पॅथॉलॉजी विभाग, असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट, कोल्हापूर आणि इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टच्या महाराष्ट्र चॅप्टरच्यावतीने हॉटेल सयाजी येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. कानडे म्हणाले, व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्यामागील अचूक कारण शोधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पॅथॉलॉजिस्ट पार पाडतात.सूक्ष्मदर्शकापासून सुरू झालेला पॅथॉलॉजीचा प्रवास डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत आणि आता एआयपर्यंत पोहोचला आहे. रोगनिदानासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा; मात्र अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचताना स्वतःचे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अनुभव यांना पर्याय नाही. या सर्वांची सांगड घालून अचूक निदान करणे आवश्यक आहे.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा म्हणाले, डिजिटल पॅथॉलॉजीमुळे रोगांचे जलद आणि अचूक निदान होण्यास मदत होईल. एआय पॅथॉलॉजिस्टची जागा घेऊ शकत नाही; मात्र निदान प्रक्रियेत ते निश्चितच उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पॅथॉलॉजिस्टनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून निदानातील अचूकता वाढवावी.

संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुचिता देशमुख यांनी ‘नेक्स्ट जनरेशन पॅथॉलॉजी’ या परिषदेच्या संकल्पनेची माहिती दिली. रुग्णाच्या उपचारप्रक्रियेत पॅथॉलॉजिस्टचे योगदान महत्त्वाचे असून, वैज्ञानिक ज्ञानासोबत सामाजिक बांधिलकीही जपली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचे महाराष्ट्र चॅप्टरचे उपाध्यक्ष डॉ. राजीव राव, सचिव डॉ. चंद्रशेखर भाले, डॉ. शैलेश कोरे, डॉ. कैलाश सचदेव, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande