
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठवाडा विभागातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी माननीय आयुक्त श्री. संजय काटकर यांनी आज बीड येथे भेट देऊन विभागातील विविध आरोग्य योजना, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील आरोग्य सेवांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील 14787 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त श्री. संजय काटकर यांचे आरोग्य विभागाच्या वतीने स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
या आढावा बैठकीमध्ये 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान, सेवा संकल्प अभियान, टीबी निर्मूलन कार्यक्रम तिशीचा पल्ला तपासणी अन सल्ला, कुटुंबकल्याण कार्यक्रम तसेच आरोग्य विभागाच्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कुटुंबकल्याण कार्यक्रमात बीड जिल्ह्याची महाराष्ट्रात अव्वल कामगिरी!
कुटुंबकल्याण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये बीड जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. कुटुंबकल्याण सेवांचे नियोजन, जनजागृती, लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे आणि आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान यामुळे जिल्ह्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
तसेच 'माझे गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये विविध आरोग्यविषयक उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे आढावा बैठकीत निदर्शनास आले. बीड जिल्ह्यात नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल आयुक्त श्री. संजय काटकर यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी लातूर विभागाचे उपसंचालक डॉ. सतीश सोळुंके तसेच बीड जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी आपापल्या स्तरावर नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दलही आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
उपजिल्हा रुग्णालय केजची पाहणी; गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेसाठी सूचना
आढावा बैठकीनंतर आयुक्त श्री. संजय काटकर यांनी उपजिल्हा रुग्णालय, केज येथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, औषधसाठा आणि रुग्णालयाच्या एकूण कामकाजाची माहिती घेतली. आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, गतिमान आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
अंबाजोगाई येथे हिमोफिलिया डे केअर सेंटरचे उद्घाटन
यानंतर अंबाजोगाई येथे हिमोफिलियाडे केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे हिमोफिलिया आजाराने ग्रस्त रुग्णांना आवश्यक तपासणी, उपचार आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना स्थानिक स्तरावर आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.
मराठवाड्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित
या आढावा बैठकीस मराठवाड्यातील नांदेड व हिंगोली हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis