
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांच्या तारखांवरून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जाहीर केलेल्या मूळ वार्षिक दिनदर्शिकेनुसार २ ते १४ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुटी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून शाळांचे दुसरे सत्र सुरू होणार होते. मात्र, विविध जिल्ह्यांतील शिक्षण विभागांनी स्थानिक परिस्थिती आणि शैक्षणिक कार्यदिवसांचे नियोजन लक्षात घेऊन सुट्ट्यांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत.न्यायालयाच्या निर्णयानुसार विदर्भातील शाळा ३०जुन पासुन सुरु झाल्या आहे.
अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार १७ नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी कमी झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीच्या सणासाठी गावी जाण्याचे किंवा सहलीचे नियोजन करणाऱ्या पालकांसमोरही सुट्ट्यांच्या तारखांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात ५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सुटी राहणार असून १९ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही याच कालावधीत सुटी देण्यात आली आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ५ ते २३ नोव्हेंबरपर्यंत सुटी राहणार आहे. २४ नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने या जिल्ह्यांतील शाळा २५ नोव्हेंबरपासून सुरू होतील. लातूर जिल्ह्यात ५ ते २४ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुटी जाहीर करण्यात आली असून २५ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत.नागपूर जिल्ह्यात मूळ वेळापत्रकानुसार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान सुटी असून १७ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. अशा प्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत मोठी तफावत दिसून येत आहे.
शाळांचे वार्षिक शैक्षणिक कार्यदिवस पूर्ण करण्याचे बंधन असल्याने स्थानिक सण, सार्वजनिक सुट्ट्या आणि जिल्हास्तरीय नियोजनानुसार सुट्ट्यांचे वेळापत्रक निश्चित केले जाते. शिक्षण हक्क कायद्यातील कार्यदिवसांच्या निकषांचा विचार करून शिक्षण विभागाकडून आवश्यकतेनुसार बदल केले जातात. त्यामुळे राज्यभर एकाच तारखेला शाळा बंद किंवा सुरू होतीलच असे नाही.
दिवाळीनिमित्त प्रवासाचे नियोजन करणाऱ्या पालकांनी केवळ राज्य शासनाच्या मूळ दिनदर्शिकेवर अवलंबून न राहता आपल्या पाल्याच्या शाळेकडून सुट्ट्यांच्या अंतिम तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. जिल्हानिहाय आदेशांमधील तफावतीमुळे विद्यार्थ्यांनीही शाळा पुन्हा सुरू होण्याच्या तारखेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी