परळीत ८.१० लाखांचा तांब्याचा साठा जप्त
बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। परळी शहरातील उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी कारवाई करून ८ लाख १० हजार रुपये किमतीचा ५४० किलो तांब्याचा साठा जप्त केला. नऊ पोत्यांमध्ये भरलेल्या या तांब्याच्या मालकीबाबत आणि स्रोताबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने संबंधित दुक
पोलीस कारवाई


बीड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। परळी शहरातील उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी कारवाई करून ८ लाख १० हजार रुपये किमतीचा ५४० किलो तांब्याचा साठा जप्त केला. नऊ पोत्यांमध्ये भरलेल्या या तांब्याच्या मालकीबाबत आणि स्रोताबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने संबंधित दुकानदाराविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (३१ ऑक्टोबर) मध्यरात्री १२.४५च्या सुमारास संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उड्डाणपुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी शब्बीर अकबर काकर (वय ४७, रा. काकर मोहल्ला, परळी) याच्या ताब्यात तांब्याच्या धातूच्या पट्ट्या असलेली नऊ पांढरी पोती आढळली. प्रत्येक पोत्यात अंदाजे ६० किलोप्रमाणे एकूण ५४० किलो तांबे होते. प्रतिकिलो १,५०० रुपये बाजारभावानुसार या साठ्याची किंमत ८ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंड यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत जप्ती पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेतला. तांब्याच्या मालकी हक्काबाबत आणि तो कोठून आणला, याबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ च्या कलम १२४ अन्वये एनसी क्रमांक २२५/२०२६ दाखल करण्यात आला.

पोलीस अंमलदार गणेश अशोकराव येरडलवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंड पुढील तपास करीत आहेत. मध्यरात्री झालेल्या या कारवाईनंतर जप्त तांब्याचा स्रोत आणि त्याच्या मालकीबाबत तपासातून काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande