
चित्रपट : 'झाड-फुंक'
कलाकार : यशपाल शर्मा, पद्मिनी कोल्हापुरे, सुंबुल तौकीर खान, हर्ष राजपूत, अप्रतिम सिंग
दिग्दर्शक : राजन रामगोपाल वर्मा
निर्माता : शैलेश परिहार
सह-निर्माता : वृंदा ब्रह्मभट्ट
प्रकार : भयपट
प्लॅटफॉर्म : जिओ हॉटस्टार
रेटिंग : ★★★½ (3.5/5)
भयपटांमध्ये भीती आणि रहस्य यांचा अचूक समतोल असणे आवश्यक असते. दिग्दर्शक राजन रामगोपाल वर्मा यांचा 'झाड-फूंक' हा चित्रपट याच मिश्रणाद्वारे प्रेक्षकांना भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात घडणारी ही कथा यशपाल शर्मा यांची गूढ उपस्थिती आणि सुम्बुल तौकीर खान यांचा भावनाप्रधान अभिनय यामुळे विशेष ठरते. अंधश्रद्धा, अलौकिक शक्ती आणि एका गर्भवती स्त्रीचा संघर्ष या विषयांभोवती फिरणारा हा चित्रपट हळूहळू आपली रहस्ये उलगडत नेतो.
कथेची सुरुवात आस्था (सुम्बुल तौकीर खान) आणि राजवीर (हर्ष राजपूत) यांच्या उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील प्रवासाने होते. आस्था गर्भवती आहे आणि राजवीरने त्यांच्या लग्नाबद्दल आपल्या कुटुंबाला न सांगितल्यामुळे ती नाराज आहे. प्रवासादरम्यान, अचानक एक गूढ स्त्री त्यांच्या गाडीसमोर येते. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा अपघात होतो आणि दोघेही जखमी होतात. शुद्धीवर आल्यावर, आस्था स्वतःला एका अनोळखी घरात पाहते, जिथे मोहन ठाकूर (यशपाल शर्मा) आणि त्यांची पत्नी कामिनी (पद्मिनी कोल्हापुरे) तिची काळजी घेत असतात. जेव्हा आस्था राजवीरबद्दल विचारते, तेव्हा तिला सांगितले जाते की अपघाताच्या वेळी ती गाडीत एकटीच होती हे ऐकून ती पूर्णपणे थक्क होते.
काही काळानंतर, त्या घरात विचित्र घटना घडू लागतात. अनाकलनीय आवाज आणि गूढ अनुभव आस्थाची भीती अधिकच वाढवतात. जेव्हा ती मोहन आणि कामिनी यांना या घटनांबद्दल विचारते, तेव्हा ते तिला 'मंजरी' नावाच्या एका स्त्रीची गोष्ट सांगतात. त्यांच्या सांगण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी मंजरीला आणि तिच्या गर्भात असलेल्या बाळाला मारून टाकले होते. मरण्यापूर्वी तिने असा शाप दिला होता की, या गावात पुन्हा कधीही कोणतेही बाळ जन्माला येणार नाही. आता, आस्थाला असे वाटू लागते की ती स्वतःही या रहस्याचा एक भाग बनली आहे. ती या घरातून सुटू शकेल का? राजवीर कुठे आहे आणि तिच्या न जन्मलेल्या बाळाचे काय होईल? या प्रश्नांभोवतीच चित्रपटाची कथा पुढे सरकते. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर, यशपाल शर्मा हे या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहेत. 'मोहन ठाकूर'च्या भूमिकेत त्यांनी गांभीर्य आणि गूढता यांचा उत्तम समतोल साधला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, संवादफेक आणि संयमित अभिनय या पात्राला प्रभावी बनवतात. अनेक दृश्यांमध्ये, केवळ त्यांची उपस्थितीच कथानकातील तणाव वाढवण्यासाठी पुरेशी ठरते. 'आस्था'च्या भूमिकेत सुम्बुल तौकीर खान हिने दमदार अभिनय केला आहे. अपघातानंतर एका अनोळखी ठिकाणी अडकलेली आणि आपल्या न जन्मलेल्या बाळाच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत चिंतेत असलेली तिची भूमिका भीती, अस्वस्थता आणि असुरक्षिततेच्या भावनेने वेढलेली आहे. सुम्बुलने या भावना अतिशय सहजतेने साकारल्या आहेत, विशेषतः तीव्र आणि तणावपूर्ण दृश्यांमध्ये तिचा अभिनय अधिक प्रभावी वाटतो. 'कामिनी'च्या भूमिकेत पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या प्रगल्भ अभिनयातून कथेत एक गांभीर्य आणले आहे. त्याचबरोबर, हर्ष राजपूतने 'राजवीर'च्या भूमिकेत, पडद्यावर कमी वेळ असूनही, आपली छाप पाडली आहे. इतर कलाकारांनीही चित्रपटातील गूढ वातावरण टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबींचा विचार करता, राजन रामगोपाल वर्मा यांनी कथेतील रहस्ये हळूहळू उलगडण्याचा मार्ग निवडला आहे. अपघात, ते रहस्यमय घर, बेपत्ता झालेला जोडीदार आणि मंजरीच्या भूतकाळाशी संबंधित प्रश्न प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. उत्तराखंडच्या डोंगराळ भागात असलेला चित्रपटाचा एकांत परिसर कथानकाला पूर्णपणे पूरक ठरतो. भयपटांमध्ये शांतता, ध्वनी आणि वातावरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. 'झाड-फूंक'मध्ये या घटकांचा वापर करून भीती आणि तणाव निर्माण करण्यात आला आहे. पार्श्वसंगीत आणि ध्वनी नियोजनामुळे (साऊंड डिझाइन) चित्रपटातील गूढ दृश्ये अधिक प्रभावी झाली आहेत. काही दृश्यांचे संपादन अधिक अचूक आणि सादरीकरण अधिक परिष्कृत असू शकले असते, तरीही तांत्रिक बाजू एकूणच चित्रपटाच्या गूढ वातावरणाला उत्तम साथ देतात.
'झाड-फूंक' हा एक असा भयपट आहे, ज्यामध्ये अलौकिक शक्ती, अंधश्रद्धा आणि रहस्य यांचा मेळ घातला गेला आहे. या चित्रपटाची कथा एका गर्भवती स्त्रीभोवती फिरते, जी एका अपघातानंतर अशा ठिकाणी पोहोचते, जिथे घडणारी प्रत्येक घटना एक नवीन आणि गोंधळात टाकणारा प्रश्न निर्माण करते. यशपाल शर्मा यांचा गूढ अभिनय आणि सुम्बुल तौकीर खान यांचा प्रभावी अभिनय या चित्रपटाला बळकटी देतात. पद्मिनी कोल्हापुरे आणि हर्ष राजपूत यांनीही आपापल्या भूमिकांमध्ये प्रशंसनीय अभिनय केला आहे. चित्रपट प्रभावीपणे भीतीचे आणि सस्पेन्सचे वातावरण कायम ठेवतो, जरी कथा काही विशिष्ट भागांमध्ये अधिक सूक्ष्मतेने सादर केली जाऊ शकते. जर तुम्ही अलौकिक, अंधश्रद्धा आणि सस्पेन्समध्ये अडकलेल्या कथांचा आनंद घेत असाल, तर 'झाड-फुंक' तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर