
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
श्रवणदोष असलेल्या आता साडेचार वर्षांच्या बालकाच्या जीवनात नवी पहाट उगविण्यात अमरावतीच्या डॉक्टरांनी यश मिळविले आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्या बालकाच्या कानावर पालकांचे शब्द पडले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात सातवी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. साडेचार वर्षांच्या जन्मतः श्रवणदोष असलेल्या बालकावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असलेल्या या बालकाच्या कुटुंबीयांना समाजमाध्यमांद्वारे विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बालकाला रुग्णालयात आणून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी व ईएनटी सर्जन डॉ. मंगेश मेंढे यांची भेट घेतली. आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरावती जिल्हा नियोजन समिती आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर त्या बालकाला नव्याने ऐकू येण्याच्या जगाची दारे खुली झाली आहेत. सदर शस्त्रक्रिया विभागीय संदर्भसेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील कान-नाक-घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे ईएनटी सर्जन डॉ. मंगेश मेंढे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. सदर शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ञ डॉ. चेतन रोंघे, डॉ. बाळकृष्ण बागवाले, डॉ अश्विनी मढावी, ऑडियोलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला मोहोड, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, ऋषिकेश धस, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधील डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाने, रजत हूमने, फार्मासिस्ट योगेश वाडेकर, बायोमेडिकल इंजिनिअर शुभम बैरागडे, अधिसेविका चंदा खोडके, मालती प्रधान, इंचार्ज सिस्टर अलका मोहोड, सुनिती हरणे, वैशाली नगराळे, दीपिका वाठोडकर आदींचे सहकार्य लाभले.
----------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी