अमरावती : दिवाळीच्या तोंडावर रेशन दुकानात गव्हाचा ठणठणाट; नागरिकांमध्ये नाराजी
अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील वर्षी दिवाळीपूर्वी रेशन दुकानांतून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. त्यामुळे यंदाही शासनाकडून आनंदाचा शिधा मिळेल, अशी अपेक्षा शिधापत्रिकाधारकांना होती. मात्र, यंदा आनंदाचा शिधा तर दूरच, अनेक रेशन दुकानांत साधे
दिवाळी तोंडावर रेशन दुकानात गव्हाचा ठणठणाट


अमरावती, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। मागील वर्षी दिवाळीपूर्वी रेशन दुकानांतून आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. त्यामुळे यंदाही शासनाकडून आनंदाचा शिधा मिळेल, अशी अपेक्षा शिधापत्रिकाधारकांना होती. मात्र, यंदा आनंदाचा शिधा तर दूरच, अनेक रेशन दुकानांत साधे गहूदेखील उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मुळावा परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये नियमित धान्यपुरवठ्याबाबतच प्रश्न निर्माण झाले आहे.

गहू उपलब्ध नसल्याने गरीब आणि गरजू कुटुंबांना ज्वारीवर समाधान मानावे लागत आहे. आधीच महागाई, शेतीतील नुकसान आणि रोजगाराच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या स्वस्त धान्य योजनेवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना पुरेसे धान्य मिळणेही कठीण होत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी दिवाळीत आनंदाचा शिधा देण्यात आल्याने यंदाही नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, यंदा या योजनेबाबत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

शेतमालाला अपेक्षित भाव नाही, खरीप हंगामातील नुकसान, मजुरांच्या हाताला काम नाही आणि दुसरीकडे वाढती महागाई, अशा दुहेरी संकटात ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे सापडली आहेत. सणासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याची खरेदी करणेही अनेकांना कठीण झाले आहे. अशा वेळी शासनाकडून मिळणारा स्वस्त धान्याचा आधार महत्त्वाचा ठरतो. मात्र, रेशन दुकानात गहूच उपलब्ध नसेल तर लाभार्थ्यांनी उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे शासन सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या योजना राबविण्याचा दावा करते, तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात रेशन दुकानांत मूलभूत धान्याचीच कमतरता जाणवत असेल, तर या योजनांचा लाभ नेमका कोणाला आणि कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

यंदा आनंदाचा शिधा वाटप होणार आहे की नाही, त्याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शिधापत्रिकाधारकांकडून होत आहे. दिवाळीच्या तोंडावर रेशन दुकानांत गहू उपलब्ध नसल्याने गरीब कुटुंबांची अडचण वाढली आहे. शासनाने आनंदाचा शिधा वाटपाबाबत निर्णय जाहीर करण्याबरोबरच नियमित धान्यपुरवठा सुरळीत करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दिवाळीसारखा सण तोंडावर आला असताना ज्वारीवरच समाधान मानावे लागत असल्याने आंनदाच्या शिधाची ग्रामीण भागातील रेशन कार्डधारकांना प्रतीक्षा लागली आहे. आनंदाचा शिधा यंदा मिळणार की नाही, याची कुठलीच शास्वती देता येणार नाही. अजूनपर्यंत कुठल्याच सूचना आल्या नाहीत, गहू मात्र पुढच्या महिन्यात येणार असल्याची माहिती रेशन दुकानचालक यांनी दिली आहे.

----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande