
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रदर्शिक कला विभागात इटलीच्या सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लुक्रेझिया मॅनिस्कोटी यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विभागातील व विभागाबाहेरील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नृत्याचे धडे गिरवले.
कला विभागात इटलीच्या सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना लुक्रेझिया मॅनिस्कोटी यांनी कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी . कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. वैशाली बोदेले यांनी, भारतीय नृत्यशैली आत्मसात करून देश-विदेशात संस्कृतीची ओळख निर्माण करणाऱ्या आणि कलेद्वारे मानवी मूल्ये जपणाऱ्या मॅनिस्कोटी या प्रभावी नृत्यांगना आहेत, असे प्रतिपादन केले. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्याचे प्रात्यक्षिके व धडे घेतले, तर 'नृत्य हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे,' असे विचार माननीय मॅनिस्कोटी यांनी व्यक्त केले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गुरु आद्यार के. लक्ष्मण यांच्या शिष्या असलेल्या मॅनिस्कोटी या नृत्यांगनेसोबतच संशोधक आणि अध्यापनतज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी मिलान विद्यापीठातून साहित्य आणि भारतीयविद्येत (इंडॉलॉजी) पदव्युत्तर पदवी घेतली असून, भारतीय आणि पाश्चात्त्य नृत्य आणि नाट्यपरंपरेचा समन्वय साधणे हे त्यांच्या कलासफारीचे वैशिष्ट्य आहे. सागोमे तेआत्रो असोसिएशनच्या संस्थापक आणि मिलान येथील अकादेमिया संगमाच्या त्या संचालक आहेत. त्यांना २०१९ मध्ये ‘नाट्यरत्न’ पुरस्काराने तर २०२१–२२ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात ‘व्हिजिटिंग आर्टिस्ट’ म्हणून मान मिळाला आहे. सूत्रसंचालन डॉ. प्रेषित रुद्रवार तर आभार डॉ.गणेश शिंदे यांनी मानले. या प्रसंगी डॉ. गजानन दांडगे, डॉ. संतोष गालफाडे, संदीप बुरसे यांच्यासह विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis