
सोलापूर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार मिळावा, यासाठी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केलेल्या दीर्घकालीन पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी २०१८ पासून यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने सन २०२५-२६ या वर्षासाठी गुणवंत कर्मचारी पुरस्कार देण्याबाबत अधिकृत परिपत्रक निर्गमित केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशल जैन आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ यांच्या माध्यमातून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या निर्णयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेतील सर्व पदांवरील आणि सर्व संवर्गांतील कर्मचाऱ्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या पुरस्कारामुळे उत्कृष्ट, नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेतली जाणार आहे. कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारीची भावना वाढीस लागण्याबरोबरच सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, आपल्या नियमित कर्तव्यापलीकडे जाऊन गुणवत्तापूर्ण, नाविन्यपूर्ण आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या पुरस्कारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व खातेप्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील पात्र कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यात सादर करावी, अशा सूचनाही प्रशासन विभागाने दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड