
पुणे, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस, तर देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता जपण्याचा संकल्प करण्यात आला.
विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात आयोजित कार्यक्रमात कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, विभागप्रमुख व संचालक प्रा. डॉ. विलास आढाव, विभागप्रमुख प्रा. डॉ. गीता शिंदे, प्रा. डॉ. अमित धोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु