
अमरावती, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।
उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
मागील दोन वर्षांपासून फुलकोबीला चांगला दर मिळत असल्याने यावर्षीसुद्धा फुलकोबीचे मोठे उत्पादन झाले. परंतु सद्यस्थितीत फुलकोबीला मिळणारे भाव प्रति किलो नऊ रुपयांवर आले आहेत. त्यामुळे परिश्रमाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.
जुलै महिन्यात लागवड केल्यानंतर वन्यप्राण्यांच्या आक्रमणामुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असतानाच काही ठिकाणच्या लागवड असलेल्या शेतशिवारात फुलकोबीच्या कोवळ्या रोपट्यांवर रानटी सशांनी हल्ला सुरू केला होता. रात्रीच्या वेळी ससे पाने कुरतडत असल्याने पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना कुंपणाला जाळी लावण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागला होता. त्यानंतर रोपांच्या वाढीसाठी नियमित निगा व काळजी घेत शेतकऱ्यांनी ७० दिवसांच्या कालावधीत फुलकोबीचे उत्पादन विक्रीसाठी तयार केले. यादरम्यान मात्र पावसाळ्याचे दिवस असतानाही समाधानकारक पाऊस न झाल्याने भाजीपाला पिकांवर कुठल्याच प्रकारची रोगराई उत्पन्न झाली नाही. याच मुख्य कारणाने अशाप्रकारच्या सर्वच पिकांचे भरघोस उत्पादन निघत आहे. मग साहजिकच बाजारपेठेत एकाच वेळी चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध झाल्याने त्याचा थेट परिणाम त्याला मिळणाऱ्या दरावर पडला.
मागील वर्षापर्यंत जाग्यावरच ४० ते ५० रुपये प्रति किलो होलसेलचा दर फुलगोबीला मिळत असताना यावर्षी मात्र तो चार पटीने कमी झाला आहे. दिवसा हरीण, रोही, नीलगाय, माकड आणि रानडुक्कर यांच्यासारख्या वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांची दमछाक होते. त्यानंतर रात्रीच्या वेळीही रानटी सशांचे आक्रमण सुरू झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चात संरक्षणासाठी ही भर पडली आहे. इतर पिकांप्रमाणे भाजीपाला पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. तेव्हा एखाद्या वेळेस नफा अनेक वेळा जमाखर्चाची बरोबरीसह तोटा मिळत असल्याने अशा परिस्थितीत खचून न जाता शेती हेच जीवन असल्याचे सांगत शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी आहे. हिरव्या वांगीप्रमाणे फुलकोबीचे पॅकिंगसुद्धा पंधरा किलोच्या पन्रीमध्ये करून ठेवावे लागते. त्यानंतर ठरलेल्या भावात खरेदी करून व्यापारी हमाल विविध ठिकाणच्या बाजारपेठेत पाठवतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी