
पुणे, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।
शब्दांमधील भाव जाणून घेत त्यांना स्वरांची साथ देत जन्माला आलेली गाणी आणि त्या गीतांच्या निर्मितीमागच्या असंख्य आठवणी... कधी गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या स्वरांची आठवण, तर कधी आशा भोसले यांच्या गायकीचा संदर्भ, कधी शांता शेळके आणि सुरेश भट यांच्या शब्दांमागच्या कथा... अशा शब्द-सूर-आठवणींच्या त्रिवेणीने पं. हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत ‘गाणी मंगेशकरांची’ ही मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.
अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे हा सांगीतिक कार्यक्रम झाला.
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांनी संपूर्ण प्रेक्षागृह सुरांनी भारून गेले. ‘माझ्या सारंगा’, ‘गोमू माझ्या तू संगतीने’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘धरला तू माझा हात’, ‘मी डोलकर डोलकर’, ‘डोलकर दर्याचा राजा’, ‘घर पाण्यावरी’, ‘बंदराला करतो ये-जा’, ‘माझे रानी, माझे मोगा’, ‘तुजे डोळ्यांत शोधता ठाव’ आणि ‘मोगरा फुलला’ अशा एकाहून एक लोकप्रिय गीतांनी रसिकांना सुरांच्या भावविश्वात चिंब भिजवले.
या गीतांचे सादरीकरण हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरलेच; मात्र त्यामागील कथा आणि आठवणींनी कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली.
एखाद्या गीताची रचना कशी सुचली, शब्दांमधील भाव ओळखून त्याला चाल कशी लाभली, संगीतबद्ध करताना कोणते प्रसंग घडले, अशा अनेक आठवणी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी रसिकांशी संवाद साधत उलगडल्या. त्यामुळे ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना त्यामागील भावविश्व जाणून घेण्याची नवी दृष्टी रसिकांना मिळाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु