
मुंबई, 05 ऑक्टोबर (हिं.स.) : दुसऱ्या तिमाहीतील व्यवसायाची आकडेवारी जाहीर केल्यानंतर सम्मान कॅपिटल लिमिटेडच्या शेअरमध्ये सोमवारी ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. कंपनीने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचा Business Update शेअर बाजारांना सादर केला आहे. या अपडेटमधून कंपनीच्या कर्जवितरण, AUM, ग्राहकवाढ आणि शाखाविस्ताराला वेग आल्याचे दिसून येते.
कंपनीच्या माहितीनुसार, Q2FY27 मध्ये सुमारे ६,००० कोटी रुपयांचे कर्जवितरण झाले. Q1FY27 मध्ये कंपनीने ३,८७५ कोटी रुपयांचे कर्जवितरण केले होते. त्यामुळे तिमाही आधारावर कर्जवितरणात सुमारे ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
AUM ५९ हजार कोटींच्या पुढे
कंपनीचे Assets Under Management (AUM) ३० सप्टेंबर २०२६ रोजी ५९,००० कोटी रुपयांच्या पुढे गेले. जूनअखेर कंपनीचे AUM ५६,२३९ कोटी रुपये होते. कर्जवितरणासोबतच वसुलीही चांगली राहिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
नवीन ग्राहकांमध्ये मोठी वाढ
दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ३०,७०० पेक्षा अधिक नवीन ग्राहक जोडले. पहिल्या तिमाहीत ही संख्या ११,८६७ होती. त्यामुळे ग्राहक जोडण्याच्या वेगातही मोठी वाढ झाल्याचे दिसते.
शाखांची संख्या २४५
व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कंपनीने वितरण नेटवर्कही वाढवले आहे. सम्मान कॅपिटलच्या शाखांची संख्या २४५ झाली आहे. कर्जवितरण आणि ग्राहकसंख्या वाढीसोबत शाखांचे जाळे विस्तारल्याने कंपनीची वितरण क्षमता वाढल्याचे दिसून येते.
Q2 निकालांपूर्वी व्यवसायवाढीचे संकेत
सम्मान कॅपिटलने अशा प्रकारचा Business Update प्रथमच जाहीर केला आहे. आगामी तिमाहींमध्ये या प्रकटीकरणाचा व्याप आणि आकडेवारीची सविस्तरता वाढत जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने जाहीर केलेली आकडेवारी तात्पुरती असून वैधानिक लेखापरीक्षकांच्या पुनरावलोकनाच्या अधीन आहे.
कंपनीने हे प्रकटीकरण SEBIच्या Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 तसेच Prohibition of Insider Trading Regulations, 2015 अंतर्गत केले आहे.
दुसऱ्या तिमाहीतील कर्जवितरण, AUM, नवीन ग्राहक आणि शाखाविस्ताराच्या आकडेवारीमुळे आगामी Q2 आर्थिक निकालांपूर्वी सम्मान कॅपिटलच्या व्यवसायाच्या वाढीचे संकेत मिळाले आहेत. मात्र या व्यवसायवाढीचा महसूल आणि नफ्यावर नेमका किती परिणाम झाला, हे कंपनीचे तिमाही आर्थिक निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या Business Update मधील आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची आहे आणि वैधानिक लेखापरीक्षकांच्या पुनरावलोकनाच्या अधीन आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी