मराठी चित्रपट ‘धप्पा’च्या टीमचे कोल्हापुरात प्रमोशन
कोल्हापूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.) |प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आणि ग्रामीण मातीतील निरागस प्रेमाची गोष्ट सांगणारा आगामी मराठी चित्रपट ‘धप्पा’ येत्या ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाच्या टीमने कोल्हापूर दौऱ्यात प
मराठी चित्रपट ‘धप्पा’ची टीम


कोल्हापूर, 08 ऑक्टोबर (हिं.स.) |प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आणि ग्रामीण मातीतील निरागस प्रेमाची गोष्ट सांगणारा आगामी मराठी चित्रपट ‘धप्पा’ येत्या ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाच्या टीमने कोल्हापूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला.

‘वृंदावन एंटरटेनमेंट अँड फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटातून अभिनेता सागर भंडारे आणि अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. या नवोदित कलाकारांनी आणि दिग्दर्शक रविराज लिंबादास वाव्होळे यांनी तरुणाईची भेट घेऊन त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. कोल्हापूरकरांकडून मिळालेल्या उत्साही आणि उदंड प्रतिसादाने संपूर्ण टीम भारावून गेली.

विशेष म्हणजे, चित्रपटातील ‘ये दूरिया’ हे कव्वाली गीत सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या दौऱ्यातही या गाण्याची विशेष चर्चा रंगली. या गाण्याचे संगीत, संगीत संयोजन आणि शब्दरचना स्वतः दिग्दर्शक रविराज वाव्होळे यांनी केली आहे. प्रशांत फासगे यांनी म्युझिक प्रोडक्शनची जबाबदारी सांभाळली असून, गायक राजू नदाफ यांच्या भारदस्त आणि सुमधुर आवाजात हे कव्वाली गीत सजले आहे. तसेच मुंबईतील नामांकित ‘यशराज स्टुडिओ’मध्ये विजय दयाल यांनी या गाण्याचे मिक्सिंग आणि मास्टरिंग केले आहे. या गाण्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

या दौऱ्यानिमित्त बोलताना दिग्दर्शक रविराज म्हणाले, “कोल्हापूर ही कला आणि संस्कृतीची समृद्ध भूमी असून इथल्या प्रेक्षकांचा मराठी चित्रपटाला नेहमीच मनापासून पाठिंबा मिळतो. ‘धप्पा’ ही प्रेक्षकांना आपल्याच घरातली किंवा आपल्याच आजूबाजूची वाटेल अशी ग्रामीण भागातील एक हृदयस्पर्शी प्रेमकहाणी आहे. प्रेम, मैत्री, संघर्ष आणि आयुष्याची अनपेक्षित वळणं या चित्रपटात पाहायला मिळतील.” अभिनेता सागर भंडारे आणि अभिनेत्री प्रतिक्षा अत्राम यांनेही आमची ही नवी प्रेमकहाणी प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, त्यामुळे ९ ऑक्टोबरला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ‘धप्पा’ नक्की पाहा,” असे आवाहन केले.

या चित्रपटाची निर्मिती सपना पोपट ढेरंगे, माधुरी राहुल दिवसे आणि सागर गीता चांगदेव भंडारे यांनी केली असून, विनोद दत्तात्रय भंडारे, अजित साहेबराव भंडारे आणि शंभु सचिन भंडारे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सागर गीता चांगदेव भंडारे यांचे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande